बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्या
छत्रपती संभाजीनगर गुन्हे: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात दुचाकीवरून जात असताना तरुण व्यापाऱ्याच्या गळ्यावर नायलॉन मांजा फिरल्याची गंभीर घटना घडली आहे. शहरातील वैजीनाथ महादेव मंदिराजवळ हा प्रकार घडला. यात नवजीवन कॉलनीतील रहिवासी असलेल्या विशाल बोथरा या तरुण व्यापाऱ्याच्या गळ्यावर धारदार मांजा फिरल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तो रस्त्यावरच कोसळला आणि काही क्षणांतच गंभीर जखमी झाला. या घटनेने वैजापुरात पुन्हा एकदा नायलॉन मांजाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. (Naylon Manja Accident)
Naylon Manja Accident: नेमकं घडलं काय?
धारदार मांजामुळे गळ्याला मोठी जखम झाल्याने उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. परिसरातील लोकांना आवाज ऐकू येताच त्यांनी जखमीला उचलून तात्काळ जवळच असणाऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी त्वरेने प्राथमिक उपचार केले. गळ्यावर झालेल्या जखमेची तीव्रता पाहता तज्ञांची अधिक मदत आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर विशाल बोथराला तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेमुळे वैजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजावरून दरवर्षी असे प्रकार चर्चेत येतात . गेल्यावर्षी याच काळात नॉयलॉन मांजाने घडलेल्या घटनांनंतर औरंगाबाद खंडपीठाने कारवाईचे आदेश दिले होते .
मांजाने गळा कापला
घटना अचानक घडल्याने मांजा नेमका कसा आणि कुठून आला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र या अपघातामुळे वाहतूक मार्गांवर अधिक सतर्कतेची गरज अधोरेखित झाली आहे. वैजापूर शहरात पतंगबाजीच्या काळात अशा मांजाचा धोका वाढतो, आणि त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतोय. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात अशा घटनांना आळा बसावा यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वीचं छत्रपती संभाजीनगरच्या जिन्सी भागात पायी जाणाऱ्या तरुणाचा गळा चिरल्याचा प्रकार समोर आला होता. पुन्हा एकदा घडलेल्या या अपघातामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, विशाल बोथरा यांना नाशिकमध्ये अधिक उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती तपासणीखाली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली असली तरी जखमेची तीव्रता पाहता त्यांना पुढील काही दिवस उपचार घ्यावे लागण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.