US Shooting – शिकागोमध्ये शनिवार-रविवार दरम्यान झालेल्या गोळीबारात 7 जणांचा मृत्यू, 38 जण जखमी
शिकागो शहरात शुक्रवार संध्याकाळपासून झालेल्या विविध गोळीबाराच्या घटनांमध्ये किमान 38 जण जखमी झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसक घटनांनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील या तिसऱ्या मोठ्या शहरात लष्करी हस्तक्षेप करण्याचा आपला विचार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. इलिनॉयचे गव्हर्नर जे. बी. प्रित्झकर मदतीसाठी का विचारत नाहीत, मी एका महिन्यात शिकागो सुरक्षित शहर बनवू शकेन असे ट्रम्प यांनी रविवारी सकाळी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ पोस्टवर म्हटले आहे.
दरम्यान, 2028 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य दावेदार मानले जाणारे इलिनॉयचे गव्हर्नर जे. बी. प्रित्झकर यांच्या कार्यालयाने ट्रम्प यांच्या या विधानावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रित्झकर यांनी यापूर्वीही ट्रम्प यांच्या लष्करी हस्तक्षेपाच्या मागणीला वारंवार फेटाळले आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात यापूर्वी न्यू ऑर्लीन्स, वॉशिंग्टन डीसी आणि मेम्फिस यासारख्या डेमोक्रॅटचे नियंत्रण असलेल्या शहरांमध्ये गुन्हेगारी नियंत्रणासाठी नॅशनल गार्डचे जवान तैनात करण्यात आले होते.
शिकागो पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत गोळीबाराच्या घटनांमध्ये किरकोळ वाढ झाली असली, तरी राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंडप्रमाणेच या शहरातही गेल्या काही वर्षांत हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण सामान्यतः घटले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवार संध्याकाळी 5 वाजल्यापासून गोळीबाराच्या किमान दोन डझन घटना घडल्या आहेत. यामध्ये रविवारी छातीत गोळी लागल्याने एका 21 वर्षीय तरुणाचा, शनिवारी संध्याकाळी एका 18 वर्षीय तरुणाचा आणि शुक्रवारी छातीत गोळी लागल्याने एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी शिकागोच्या एका रस्त्यावर जमलेल्या गर्दीवर एका एसयूव्ही कारमधून आलेल्या दोघांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये 12 जण जखमी झाले. जखमींमध्ये 17 ते 47 वयोगटातील आठ पुरुष आणि चार महिलांचा समावेश असून त्यांच्यावर चार वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हा गोळीबार अमेरिकेत गुलामगिरी संपल्याचा आनंद साजरा करणाऱ्या ‘जूनटींथ’ या सुट्टीच्या दिवशी झाला. शिकागोचे महापौर ब्रँडन जॉन्सन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या घटनेचा निषेध केला आहे.
Comments are closed.