भारताने मालिका जिंकली, पण अफगाणिस्तानच्या कर्णधाराने केली मोठी चूक; ICCने दिली कडक शिक्षा! चेन्

भारत विरुद्ध अफगाणिस्तान तिसरी वनडे : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील नुकतीच संपलेली 3 सामन्यांची वनडे मालिका भारताने 3-0 अशी खिशात घालत क्लीन स्वीप केला. मात्र, ही मालिका संपताच अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) मोठा झटका बसला आहे. चेन्नई येथे 20 जून रोजी झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात केलेल्या एका गंभीर चुकीमुळे आयसीसीने शाहिदीला कडक फटकारले आहे.

नेमकं काय घडलं? वारंवार इशारा देऊनही तीच चूक!

सामन्यादरम्यान हशमतुल्लाह शाहिदी आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग करताना दोषी आढळला. आयसीसीच्या नियमानुसार शाहिदीला लेव्हल 1 चा दोषी ठरवण्यात आले असून, त्याने कलम 2.10.10 चे उल्लंघन केले आहे. सामन्यात फलंदाजी करत असताना शाहिदी वारंवार खेळपट्टीच्या (Pitch) डेंजर एरियामध्ये धावत होता, ज्यामुळे खेळपट्टीचे नुकसान होऊ शकत होते. धक्कादायक बाब म्हणजे शाहिदीने ही चूक एकदा नाही तर अनेकदा केली. अफगाणिस्तानच्या डावातील 31 व्या षटकात पंचांनी त्याला खेळपट्टीवर न धावण्याचा पहिला इशारा दिला होता. त्यानंतर 40 व्या षटकात त्याने पुन्हा तीच चूक केली, ज्यामुळे पंचांनी त्याला दुसरी चेतावणी दिली. वारंवार सांगूनही शाहिदीने पंचांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले.

आयसीसीने केली मोठी कारवाई

कर्णधाराच्या या चुकीमुळे अफगाणिस्तान संघाला सामन्यात 5 धावांची मोठी पेनल्टी सोसावी लागली. या धावा भारताच्या खात्यात जोडल्या गेल्या. आयसीसीने शाहिदीला केवळ फटकारलेच नाही, तर त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये 1 डिमेरिट पॉईंट देखील जोडला आहे. शाहिदीची गेल्या 24 महिन्यांतील नियम उल्लंघनाची ही पहिलीच वेळ आहे. शाहिदीने आपली चूक मान्य केली असून सामनाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे, त्यामुळे या प्रकरणावर पुढील अधिकृत सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

तिसऱ्या वनडे सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा नऊ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 44.2 षटकांत 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 28.4 षटकांत एक गडी गमावून 224 धावा केल्या आणि सामना जिंकला. अशाप्रकारे, भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानवर 3-0 ने क्लीन स्वीप पूर्ण केला.

या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने उत्कृष्ट गोलंदाजी केली, तर रोहित आणि यशस्वीने मोठ्या भागीदारीने संघाला मजबूत सुरुवात करून दिली. या सामन्यात यशस्वी आणि रोहितने भारतासाठी जोरदार फलंदाजी केली. या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 170 धावा केल्या. रोहित 79 धावांवर बाद झाला, तर यशस्वी 86 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि तीन षटकारांसह 110 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, श्रेयस अय्यर दोन षटकारांसह 19 चेंडूंमध्ये 20 धावा करून नाबाद राहिला. मोहम्मद नबीने अफगाणिस्तानसाठी एकमेव बळी घेतला.

हे ही वाचा –

ENG vs NZ 2nd Test : खेळ खल्लास! ICCच्या एकाच फटक्यात इंग्लंड गारद; 12 गुण कापले, खिसाही रिकामा केला अन् WTC फायनलच्या शर्यतीतून OUT

Comments are closed.