FIFA World Cup 2026 – 92 वर्षांची प्रतीक्षा संपली! इजिप्तचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इजिप्तच्या फुटबॉल इतिहासात अखेर एक नवी पहाट उजाडली आहे. तब्बल 92 वर्षे पिढ्यान् पिढ्या ज्या एका ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत होत्या, तो सुवर्णक्षण अखेर प्रत्यक्षात आला. स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सालाहच्या जादूच्या जोरावर इजिप्तने फिफा विश्वचषक स्पर्धेत नवा इतिहास रचला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात इजिप्तने न्यूझीलंडचा 3-1 असा पराभव करत विश्वचषकातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयामुळे इजिप्तने ‘ग्रुप जी’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

1934 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक खेळणाऱ्या इजिप्तला यापूर्वी कधीही विजयाची चव चाखता आली नव्हती. व्हँकुव्हर येथील बीसी प्लेस स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही न्यूझीलंडने सुरुवातीला वर्चस्व राखले होते. न्यूझीलंडचा बचावपटू फिन सुरमन याने कॉर्नरवर उत्कृष्ट हेडर मारत गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत इजिप्तचा संघ एक गोलने पिछाडीवर होता.

दुसऱ्या हाफमध्ये इजिप्तने खेळाचा वेग वाढवला. 58 व्या मिनिटाला मोहम्मद हानीच्या क्रॉसवर मोस्टफा झिकोने सुरेख हेडर करत इजिप्तला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर 67 व्या मिनिटाला मोहम्मद सालाहने झिकोसोबत अप्रतिम वन-टू पासिंग करत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडत इजिप्तला 2-1 ने पुढे नेले. 81 व्या मिनिटाला सालाहच्या कॉर्नरवर बदली खेळाडू महमूद ट्रेझेगुएने डायव्हिंग हेडर करत तिसरा गोल केला आणि इजिप्तचा विजय निश्चित झाला.

सामना संपल्याची शिट्टी वाजताच स्टेडियममध्ये इजिप्तच्या चाहत्यांसह खेळाडूंनीही एकच जल्लोष केला. इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन यांनी इजिप्तचा ध्वज घेऊन संपूर्ण मैदानाला फेरी मारली. आज आम्हाला मायदेशात खेळत असल्यासारखे वाटत होते, असे होसाम हसन म्हटले.

बाद फेरीच्या आशा उंचावल्या

बेल्जियमविरुद्धचा पहिला सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर आता इजिप्तचे दोन सामन्यांत 4 गुण झाले आहेत. ‘ग्रुप जी’ मधील दुसऱ्या सामन्यात इराण आणि बेल्जियम यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. आता इजिप्तचा पुढील आणि अंतिम गट सामना इराणविरुद्ध होणार असून बाद फेरीमध्ये पोहोचण्यासाठी इजिप्तचे पारडे जड झाले आहे.

FIFA World Cup 2026 – वारचा राडा

Comments are closed.