कतारमध्ये गॅस एक्स्पोर्ट टर्मिनल सुरू करताना भीषण स्फोट; 54 जण जखमी, 18 जण बेपत्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कतारमधील एका मुख्य नैसर्गिक गॅस एक्स्पोर्ट टर्मिनलवर रविवारी रात्री भीषण स्फोट झाला. युद्धादरम्यान इराणने केलेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर हे टर्मिनल पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न कामगार करत असताना हा अपघात घडला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत किमान 54 जण जखमी झाले असून, घटनेच्या काही तासांनंतरही अन्य 18 जण अद्याप बेपत्ता आहेत.

रास लफ्फान औद्योगिक क्षेत्रात झालेल्या या स्फोटामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत पुन्हा एकदा मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण कतार हा जगातील आघाडीच्या नैसर्गिक वायू उत्पादक देशांपैकी एक आहे. यापूर्वी इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्यामुळे कतारला आपल्या ग्राहकांपर्यंत गॅसचा पुरवठा करणे अशक्य झाले होते, ज्यामुळे कतारने आपले उत्पादन तात्पुरते बंद केले होते. सध्या युद्ध कायमचे थांबवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींदरम्यान इराणने या सागरी मार्गावरील आपले नियंत्रण काहीसे शिथिल केले आहे. याच पार्श्वभूमीवर कतारने आपले निर्यात टर्मिनल पुन्हा सुरू करण्याचे काम हाती घेतले होते. सरकारी मालकीच्या ‘कतारएनर्जी’ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ‘बरझान गॅस सप्लाय’ केंद्रावर हे काम सुरू असतानाच अचानक स्फोट झाला आणि आग लागली.

या स्फोटामुळे नेमके किती नुकसान झाले आहे याची अचूक माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी या घटनेत केवळ काहीच लोक जखमी झाल्याचे सांगितले होते, मात्र काही तासांनंतर कतारच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून या दुर्घटनेची भीषणता समोर आली आहे.

Comments are closed.