विलेपार्ल्यात शाळेच्या बाजूला कबुतरखाना; हजारो मुलांचे आणि रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
सार्वजनिक ठिकाणी कबुतरखाने चालवण्यावर बंदी असताना विलेपार्ले येथे न्यू एअरपोर्ट कॉलनीतील एअरपोर्ट हायस्कूलच्या बाजूलाच कबुतरखाना असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही कबुतरखाना बंद झालेला नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
विलेपार्लेच्या न्यू एअरपोर्ट कॉलनीत सिव्हिल एव्हिएशन स्कूल असोसिएशनची शाळा आहे. या शाळेला लागूनच कबुतरखाना आहे. या कॉलनीतून बामणवाडा आणि हनुमान रोडला जोडणारा शॉर्टकट रस्ता आहे. या रस्त्यावरून जाणारे नागरिकही कबुतरांमुळे त्रस्त आहेत. कबुतरांची घाण, विष्ठा, उडणाऱया पिसांचा त्रास सहन करावा लागत आहे.
शिवसेनेने उठवला आवाज
कबुतरखान्याचा मुद्दा सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत उपस्थित झाला. शिवसेनेच्या नगरसेविका सोनाली साबे यांनी कबुतरखान्याचे फोटो शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्यासमोर सादर केले. कबुतरांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे साबे यांना सांगितले. शाळेसमोर राजरोसपणे सुरू असलेला कबुतरखाना त्वरित बंद करण्याची मागणी सोनाली साबे यांनी केली. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपायुक्तांनी यावेळी दिले.
दिवसागणिक कबुतरांचा त्रास वाढत आहे. काही जैनधर्मीय स्कूटरवरून येऊन धान्याच्या पोतीच्या पोती रिकामे करून जातात. हा कबुतरखाना बंद केला पाहिजे.
– विश्वास करंदीकर, रहिवासी
कबुतरांचा उपद्रव एवढा वाढलाय की, ती थेट घरात, बाल्कनीत येऊ लागली आहेत. सगळेच हैराण आहेत. तक्रार करूनही काहीही होत नाही.
– सुजाता फडके, रहिवासी
Comments are closed.