चिनी सैनिक अरुणाचलात 50 किलोमीटर आत घुसले! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा खळबळजनक दावा
अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैनिक हिंदुस्थानी सीमेच्या 40 ते 50 किलोमीटरपर्यंत आत शिरले आहेत. सीमेवर अनेक ठिकाणी हिंदुस्थानी आणि चिनी सैनिक आमनेसामने आले असून जुलै महिन्यात सैनिकांमध्ये हाणामारी व लाठीमार झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बोसिराम सिरम यांनी केला आहे.
जुलैच्या अखेरपासून अरुणाचल प्रदेशमध्ये सुबनसिरी जिह्यात असाफिला आणि माजा भागात हिंदुस्थान आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री सुरू असल्याचा गौप्यस्पह्ट इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाचे (आयटीबीपी) महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी गेल्या आठवडय़ात केला होता. त्यावरून मोदी सरकारवर देशभरातून टीकेची झोड उठत आहे. चिनी सैनिकांसोबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत बोसिराम सिरम यांनी सांगितले की, अप्पर सुबनसिरी जिह्यात चिनी सैनिक हिंदुस्थानी सीमेच्या 40 ते 50 किलोमीटर आत शिरले आहेत. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ापासून हिंदुस्थानी आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष होत आहे. त्यामुळे सीमेवरील सैनिकांचा पहारा आणि स्थानिकांच्या दिनचर्येवर परिणाम होत आहे. या भागात स्थानिकांना याक चरायला नेणे तसेच जंगलांमधून इतर आवश्यक वस्तू आणता येत नाही, असे सिरम यांनी सांगितले.
काँग्रेसच्या चार मागण्या
काँग्रेसने केंद्र सरकारकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. सीमेलगतच्या भागात 24 तास मोबाईल आणि इंटरनेट सुविधा मिळायला हवी, प्रत्येक हवामानात सीमेपर्यंत पोहोचता येईल, असे रस्ते निर्माण करायला हवे, सैनिकांना चांगल्या सुविधा द्याव्या तसेच स्थानिक तरुणांना प्राधान्य देत अरुणाचल रेजिमेंट बनविण्याबाबत विचार करायला हवा, या मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.
व्हिडीओ खोटा, लष्कराने फेटाळला दावा
चीनने अरुणाचल प्रदेशातील असाफिला, लॉन्गजू आणि तक्षिंग सर्कलवर कब्जा केला आहे आणि हिंदुस्थानी सैनिकांना आवश्यक वस्तू मिळत नाहीत, असा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात लेफ्ट. जनरल गिरीश कालिया यांच्या नावाने दावा करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ खोटा असल्याचे हिंदुस्थानी लष्कराने म्हटले आहे. हा मूळ व्हिडीओ 27 ऑक्टोबर रोजी जम्मू-कश्मीरमध्ये कुपवाडा येथे झालेल्या पत्रकार परिषदेचा असून तो एडिट करून व्हायरल करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे.
स्थानिकांच्या तक्रारींवरून चौकशी करायला हवी
बोसिराम सिरम यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने 26 ते 29 ऑगस्ट 2026 या कालावधीत अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेलगतच्या भागात दौरा केला होता. यात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री तांगा बायलिंग तसेच अपर सुबनसिरीचे खासदार जारोडुम क्री यांचाही समावेश होता. शिष्टमंडळाने सीमेजवळच्या स्थानिकांसोबत चर्चा केली. यासंदर्भात सिरम म्हणाले की, स्थानिकांच्या तक्रारींना अफवा म्हणून दुर्लक्ष करणारे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी सखोल तपास करायला हवा.
Comments are closed.