माहीम कॉजवे परिसरात रास्ता रोको आंदोलन, वाढत्या अपघातांविरोधात नागरिक रस्त्यावर
माहीम कॉजवे येथील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले आणि सरकारला वाढत्या अपघातांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. बुधवारी टँकरमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांना हकनाक जीव गमवावा लागला. या घटनेमुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. माहीम कॉजवे व मच्छीमार वसाहतीतील नागरिकांनी रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखली.
माहीम कॉजवे परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. वाहनधारक बेदरकार ड्रायव्हिंग करीत असून सिग्नलवर थांबण्याचा नियम पाळला जात नाही. त्यामुळे सिग्नल ओलांडणाऱया नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी बुधवारी रस्त्यावर ठिय्या मांडून दोन्ही दिशेकडील वाहतूक रोखून धरली. शिवसेना नगरसेवक, माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी नागरिकांची मागणी वरिष्ठ अधिकाऱयांच्या निदर्शनास आणली. गेल्या काही महिन्यांत विविध अपघातांत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
Comments are closed.