रील बनवण्यासाठी टाकीवर चढला आणि अडकलो!

16 तासांनंतर दोन मुलांची सुटका : तिघेजण पडले, एकाचा मृत्यू : हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत

वृत्तसंस्था/ सिद्धार्थनगर

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे पाण्याच्या टाकीत 16 तास अडकलेल्या मुलांना हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवण्यात आले. दोघांनाही गोरखपूर येथील हवाई दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी सिद्धार्थनगर येथील काशीराम आवास कॉलनीतील 60 फूट उंच पाण्याच्या टाकीवर पाच मुले रील बनवण्यासाठी चढली होती. खाली उतरताना शिडी तुटल्याने तीन मुले खाली पडली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोन मुले एका सळीला धरून हळूहळू टाकीवर परत चढली. मात्र, त्यांच्या सुटकेसाठी हवाई दल आणि लष्करी जवानांची मदत घ्यावी लागली.

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे पाण्याच्या टाकीत अडकलेल्या किशोरवयीन मुलांना जवळपास 16 तासांनंतर अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आले. रविवारी सकाळी गोरखपूरहून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने ही बचाव मोहीम राबवली. हेलिकॉप्टर सकाळी अंदाजे 5:20 वाजता घटनास्थळी पोहोचले आणि 15 मिनिटांच्या बचावकार्यानंतर त्या मुलांना टाकीवरून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या बचावकार्यादरम्यान वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण घटनेनंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यशस्वी बचावकार्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी हवाई-लष्करी पथकाचे कौतुक केले. संपूर्ण बचावकार्यादरम्यान घटनास्थळी रात्रभर गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी (डीएम), अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एसडीएम आणि सदरचे कमांडिंग ऑफिसर यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बचावकार्यावर देखरेख ठेवली.

टाकीभोवती दलदल असल्याने बचावकार्यात अडथळे

टाकीभोवतीच्या दलदलीमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. सुरुवातीला हायड्रॉलिक क्रेन मागवण्यात आली, परंतु दलदलीमुळे ती टाकीपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे, 150 मीटर रस्ता बांधण्याचे काम सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत 120 मीटरचे काम पूर्ण झाले होते. दरम्यान, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे काम थांबवावे लागले. परिस्थिती पाहता प्रशासनाने लष्कराची मदत मागितली. रविवारी सकाळी 5:20 च्या सुमारास हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले.

अशी घडली घटना…

12 वर्षीय बाळे नामक मुलगा चार दिवसांपूर्वी सिद्धार्थनगर येथील काशीराम आवास कॉलनीत राहणाऱ्या त्याचा चुलतभाऊ दीपचंदच्या घरी आला होता. शनिवारी दुपारी 3 वाजता तो त्याचे शेजारी गोलू (15), शनी (11), कल्लू (15) आणि पवन (16) यांच्यासोबत घराशेजारील एका मोडकळीस आलेल्या पाण्याच्या टाकीवर सोशल मीडिया रील बनवण्यासाठी चढले. थोड्या वेळाने ते सर्व एक-एक करून खाली उतरू लागले, तेव्हा ती मोडकळीस आलेली शिडी अचानक तुटल्यामुळे बाळे, शनी आणि गोलू खाली पडले. शिडी अंगावर पडल्यामुळे बाळे नामक मुलाचा जागीच मृत्यू झाला. शनी आणि गोलू जखमी झाले. तर कल्लू आणि पवन वर अडकले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. घाईघाईने लोकांनी जखमींना उचलून रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी बाळेला मृत घोषित केले. माहिती मिळाल्यानंतर, जिल्हाधिकारी शिवशरणप्पा जीएन आणि एसएसपी अभिषेक महाजन यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी यंत्रसामुग्री मागवून दोरीच्या साहाय्याने मुलांना अन्न आणि पाणी पोहोचवण्यात आले.

Comments are closed.