नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांचे व सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न बाजूला ठेऊन वेगळाच वाद समोर येत आहे. त्यातच, उपराजधानी नागपूरमध्ये दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळतआहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी होणारे शहर आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फडनाविस) यांनी नागपूरच्या (Nagpur) जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तर, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही एबीपी माझाशी संवाद साधताना, पोलिसांच्या संपर्कात असून नागपूरकरांना शांततेचं आवाहन करत असल्याचं म्हटलंय. सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्याचंही सांगण्यात येत आहे.
नागपूरमध्ये आज दुपारी काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागणी केली जात होती. त्यावेळीही, दोन गटात किरकोळ वाद झाला होता. नागपूरमधील दुपारचा किरकोळ वाद मिटल्यानंतर सायंकाळी 7 ते 7.30 वाजताच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाजवळ पोहोचला आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. दुपारी झालेल्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता, या घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं आणि सर्वांना शिवाजी चौकावरुन चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले आहे. शहरातील चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगडफेक सुरु झाली आहे. त्यामुळे, पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी बल प्रयोग करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या आकाराचे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावले जात असल्याने पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या वापरण्यात आले आहे.दरम्यान, नागपुरातील या दगडफेकीमध्ये काही गाड्यांचे नुकसान झाले असून कारही जळाल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान, नागपूरकरांना शांततेचं आवाहन करण्यात आलंय.
मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.