रोहितच्या फॉर्मबद्दल कोणतीही चिंता नाही! निवृत्तीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षक मॉर्केल नेमकं काय म्हणाले?
टीम इंडिया आणि इंग्लंड (Team india vs England 3rd Odi) यांच्यातील वनडे मालिकेचा शेवटचा सामना 19 जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी माजी कर्णधार रोहित शर्माच्या (Former Captain Rohit Sharma) नावावर सर्वाधिक चर्चा होत आहे. ज्यामध्ये मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सामना रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो अश्या चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र, आता बीसीसीआयने रोहितच्या निवृत्तीच्या अफवा चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर, सामन्याच्या आदल्या दिवशी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षकांनीही असे म्हटले की, (Indian cricket team Bowling Coach Morne Morkel on Rohit Sharma) रोहितच्या फॉर्मबद्दल संघात कोणतीही चिंता किंवा चिंतेची बाब नाही.
भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी रोहित शर्माचे समर्थन करताना सांगितले की, तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि स्वतःच्या जोरावर सामना फिरवू शकतो. रोहितच्या अडचणी समजून घेताना त्यांनी सांगितले की, इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत नवीन चेंडूचा सामना करणे सोपे राहिलेले नाही. तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मीडियाशी संवाद साधताना मॉर्केल म्हणाले की, नवीन चेंडूने सुरुवात करणे हे खरोखरच खूप कठीण काम आहे. या संपूर्ण मालिकेत चेंडू खूप स्विंग होत आहे, त्यामुळे सुरुवातीला धावा करणे सोपे नाही. पण मला पूर्ण खात्री आहे की रोहित या अडचणीतून स्वतःला बाहेर काढेल.
मॉर्केल पुढे म्हणाले की, रोहित यापूर्वीही अनेकदा अशा अडचणींतून बाहेर पडला आहे, त्याचा जुना अनुभव यावेळी कामी येईल. त्याच्या संघात असण्यामुळे इतर फलंदाजांनाही आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे त्याच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल संघात कोणतीही तणावाची किंवा चिंतेची बाब नाही. इंग्लंड मालिकेत रोहितची कामगिरी चांगली राहिलेली नाही. पहिल्या सामन्यात तो 11 धावा करून बाद झाला होता. तर दुसऱ्या वनडेमध्ये त्याने 47 चेंडूत 26 धावांची संथ खेळी केली होती. या मालिकेत तो चेंडू योग्यरित्या टाइम करताना संघर्ष करताना दिसला आहे.
दुसरीकडे, रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया (Devjit Saikia) म्हणाले की, रोहित भारतीय वनडे संघाचा नियमित सदस्य आहे आणि जोपर्यंत तो टीमचा भाग आहे, तोपर्यंत देशाचे प्रतिनिधित्व करत राहील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, लॉर्ड्समध्ये खेळला जाणारा वनडे सामना हा त्याचा शेवटचा सामना नसेल. तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान आता चाहत्यांच्या नजरा साहजिकच रोहित शर्मावर राहणार आहेत. रोहित लॉर्ड्स वनडे सामन्यात नक्कीच मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल.
Comments are closed.