एक डाव जगज्जेतेपदाचा; अर्जेंटिना-स्पेन आज अंतिम फेरीत भिडणार, मेस्सीची शेवटची कीक की यमालचा उदय
तब्बल 48 संघांमध्ये रंगलेला फिफा वर्ल्ड कपचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचलाय. रविवारी मध्यरात्रीनंतर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात विजेतेपदासाठी महासंग्राम रंगणार आहे. विद्यमान जगज्जेता अर्जेंटिना विरुद्ध युरोपियन विजेता आणि फिफा क्रमवारीतील अव्वल स्पेन अशी ही रंगतदार अंतिम लढत म्हणजे फुटबॉलविश्वासाठी एक पर्वणी ठरणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला फ्रान्सला जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानले जात होते, तर इंग्लंडकडूनही मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र अखेर विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत मेस्सीची अर्जेंटिना आणि यमालची स्पेन आमने-सामने उभे ठाकले आहेत.
स्पेन – अभेद्य बचाव आणि ‘टिकी-टाका’ची ताकद
- विश्वचषक सहभाग – 17
- सर्वोत्तम कामगिरी – विजेता (2010)
फिफा क्रमवारी – 1
बलस्थान – जगातील सर्वात मजबूत बचावफळी
स्पेनने या विश्वचषकात आतापर्यंत केवळ एकच गोल स्वीकारला आहे. त्यांची शिस्तबद्ध बचावफळी आणि चेंडूवरील नियंत्रण हे सर्वात मोठे बलस्थान मानले जाते. रोद्री आणि फॅबियन रुईझ यांच्या नेतृत्वाखाली स्पेनचा प्रसिद्ध ‘टिकी-टाका’ खेळ अजूनही प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
कमकुवत बाजू – संथगतीचा खेळ
स्पेनचा छोट्या पासेसवर आधारित खेळ काही वेळा संथ ठरतो. विशेषतः बचावात्मक खेळणाऱया संघांविरुद्ध त्यांना संधी निर्माण करण्यात अडचणी आल्या आहेत. अर्जेंटिनाही अशीच रक्षणात्मक रणनीती अवलंबू शकते.
अर्जेंटिना – मेस्सीभोवती फिरणारी जेतेपदाची मोहीम
- विश्वचषक सहभाग – 18
- सर्वोत्तम कामगिरी – विजेता (1978, 1986, 2022)
- फिफा क्रमवारी – 3
बलस्थान – मेस्सीची जादू आणि भक्कम मध्यफळी
39 वर्षीय मेस्सी अजूनही अर्जेंटिनाचा सर्वात मोठा आधार आहे. या विश्वचषकात त्याने आठ गोल करत ‘गोल्डन बूट’वर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. मेस्सीला एन्झो फर्नांडेझ, ऍलेक्सिस मॅक ऑलिस्टर आणि लिएँड्रो परेडेस या मध्यफळीतील त्रिकुटाची उत्तम साथ लाभली आहे.
कमकुवत बाजू – मेस्सीवर अतिनिर्भरता
अर्जेंटिनाची सर्वात मोठी चिंता म्हणजे मेस्सीवर असलेले प्रचंड अवलंबित्व. ज्युलियानो सिमेओने, ज्युलियन अल्वारेझ आणि लौतारो मार्टिनेझ यांच्यासारखे आक्रमक खेळाडू असले तरी मेस्सीशिवाय संघाकडे सामन्याचे चित्र पालटणारी तीच जादू दिसत नाही.
लक्षवेधी खेळाडू
- लमिन यमल
- निको विल्यम्स
- रोडरी
- फॅबियन रुईझ
- उनय सायमन
कामगिरीचा आलेख
स्पर्धेची सुरुवात कोबो व्हर्डेविरुद्ध धक्कादायक गोलशून्य बरोबरीने झाली. त्यानंतर सौदी अरेबिया, उरुग्वे, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, बेल्जियम आणि फ्रान्सचा पराभव करत स्पेनने अंतिम फेरी गाठली. स्पेन गेल्या 37 सामन्यांत अपराजित असून त्यांचा शेवटचा पराभव मार्च 2024 मध्ये कोलंबियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात झाला होता.
लक्षवेधी खेळाडू
- लिओनेल मेस्सी
- लॉटारो मार्टिनेझ
- ज्युलियन अल्वारेझ
- रॉड्रिगो डी पॉल
- लिसांड्रो मार्टिनेझ
कामगिरीचा आलेख
अर्जेंटिनाने विश्वचषक पात्रता फेरीत इक्वेडोरविरुद्ध 0-1 असा पराभव पत्करल्यानंतर सलग 14 सामने जिंकले आहेत. साखळी फेरीत त्यांनी आठ गोल करत केवळ एकच गोल स्वीकारला, मात्र बाद फेरीत त्यांना कडवी झुंज द्यावी लागली. कोबो व्हर्डे, इजिप्त, स्वित्झर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या विजयांसाठी अर्जेंटिनाला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला.
Comments are closed.