कोल वॉशरीच्या प्रदूषणाने पांढरा कापूस झाला काळा; प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एखाद्या प्रकल्पाच्या प्रदूषणाने शेतकऱ्यांची काय दुर्दशा होऊ शकते, याचा प्रत्यय चंद्रपुरात येत आहे. प्रदूषणाच्या जीवघेण्या समस्येमुळे या शेतकऱ्यांनी थेट प्रदुषण नियंत्रण अधिकाऱ्याचीच पोलिसात तक्रार केली. चंद्रपूरलगतच्या साखरवाही औद्योगिक वसाहत परिसरात महामाया इन्फ्रा डेवलपर्स नावाची कंपनी आहे. ही कंपनी कोळसा धुवून तो वीज प्रकल्पाला पाठवते. हजारो टन कोळसा खाणीतून इथे येतो रोज येतो आणि धुतला जातो. यातून होणाऱ्या प्रदूषणाचा शेतीला फटका बसत आहे.

या प्रकल्पाला लागूनच बेलसनी गावच्या शेतकऱ्यांची शेती आहे. ही शेती मागील तीन चार वर्षांपासून ओसाड पडली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या कोल वॉशरीचे प्रदूषण. या वॉशरीतून दिवसरात्र कोळशाची काळी धूळ उडते आणि लगतच्या शेतात जाते. त्यामुळे कापूस, सोयाबीन ही पिके काळवंडून जातात. शेतीत काळ्या भुकटीचा थर जमा झाला. त्यामुळे पिके वाढत नाहीत आणि त्याचा दर्जाही खालावतो. बाजारात या पिकाला भाव मिळत नाही. कापूस एवढा काळा पडतो की, तो तोडायला मजूर नकार देतात. या प्रकल्पातून एक नैसर्गिक नाला वाहतो. त्याचीही दुर्दशा झाली आहे. तिथेही काळया भुकटीचा थर साचला आहे. शिवाय कोळसा धुतलेले पाणी याच नाल्यात सोडले जाते. त्यामुळे शेतीला मिळणारे पाणीही उपयोगाचे राहिलेले नाही.

गेल्याच आठवड्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकल्पाला भेट दिली. तेव्हा इथली भीषणता त्यांच्याही लक्षात आली. शासनाच्या एका समितीने इथे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 65 लाख रुपये द्यावे, अशी शिफारस केली. मात्र त्यावरही अंमल झाला नाही. त्यामुळे शेतकरी आता त्रस्त झाले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे कमालीचे दुर्लक्ष केले. त्यामुळे या अधिकाऱ्याल धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार केली. ही तक्रार प्रदूषण नियंत्रण अधिकारी तानाजी यादव यांच्याविरोधात आहे.

महामाया इन्फ्रा ही कंपनी इथे कोळसा धुण्याचे काम करीत असली, तरी तिथे पाण्याची कायमस्वरूपी सोयच नसल्याचे वास्तवही समोर आले आहे. टँकरने पाणी घेत हे काम केले जात आहे. त्यामुळे इथे कोळसा खरच धुतला जातो का, हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments are closed.