'झुरळ'ला स्पर्धक मिळतो
काँग्रेसच्या युवाशाखेचीही विडंबनात्मक वेबसाईट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोशल मिडियावर प्रारंभ करण्यात आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला अवघ्या 15 दिवसांमध्येच एक प्रतिस्पर्धी मिळाला आहे. हा प्रतिस्पर्धी दुसरा-तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष काँग्रेसची युवाशाखा आहे. या युवाशाखेने ‘रियल कॉक्रोच’ नामक एक विंडबनात्मक गट स्थापन केला असून एक वेबसाईटही उघडली आहे. या ‘रियल कॉक्रोच’ने मूळच्या कॉक्रोच जनता पार्टीला एक सज्जड इशारा दिला आहे.
‘आम्ही तुमच्यासारखे आभासी कॉक्रोच नाही. आम्ही खरे कॉक्रोच आहोत. आम्ही आभासी क्रांती करत नाही. आम्ही रस्त्यावर येऊन व्यवस्थेशी भांडतो,’ असा रियल कॉक्रोचचा मूळच्या कॉक्रोचना इशारा आहे. त्यामुळे आता या दोन कॉक्रोच गटांमध्ये तुंबळ रणकंदन माजणार, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मीम्स आणि विडंबने
सध्या हे दोन्ही कॉक्रोच गट विनोदी मीम्स आणि विडंबने यांचे प्रसारण आपल्या वेबसाईटवरुन करीत आहेत. मूळच्या कॉक्रोच जनता पार्टीची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. या पार्टीचा संस्थापकही आता वेबसाईट उघडू शकण्याच्या स्थितीत नाही. या गटाच्या नव्या ‘एक्स’ हँडलला पूर्वीच्या इन्स्टाग्रॅमच्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काँग्रेसच्या युवा शाखेने प्रारंभ केलेल्या रियल कॉक्रोच गटाच्या वेबसाईटला किती पाठिंबा मिळत आहे, याची आकडेवारी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. काँग्रेसच्या युवा शाखेच्या म्हणण्यानुसार रियल कॉक्रोच मूळच्या कॉक्रोचची नक्कल करत नाही आणि नव्या कॉक्रोच वेबसाईटचे स्वरुपही भिन्न आहे. मूळच्या कॉक्रोच वेबसाईचा प्रारंभ काँग्रेसच्या रियल कॉक्रोचपेक्षा एक दिवस अगोदर झाला. रियल कॉक्रोच एक दिवसाने मागे पडली आहे. 16 मे पासूनच काँग्रेसने ‘कॉक्रोच टाईम्स’ नामक वेबसाईटचा विचार चालविला होता. पण त्याआधीच मूळच्या कॉक्रोच जनता पार्टीने आपली वेबसाईट उघडली, असे काँग्रेसच्या रियल कॉक्रोच गटाचे म्हणणे आहे. तेव्हा, आता दोन ‘झुरळां’मध्येच संघर्ष बघायला मिळणार का, की आणखी काही घडामोडी घडणार, असा गहन प्रश्नही सर्वसामान्यांना पडला आहे, असे पहावयास मिळत आहे.
Comments are closed.