झुरळांचा जनता पक्षाचा दिल्लीत निषेध

नीट पेपरफुटीविरोधात दुसऱ्यांदा उठवला आवाज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) शेकडो समर्थकांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात शनिवारी दुसऱ्यांदा आवाज उठवला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांनी थाळ्या वाजवल्या आणि ‘जा, प्रधान, जा’च्या घोषणा दिल्या. ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपके हे स्वत: गांधी आणि आंबेडकर यांचे फोटो घेऊन मंचावर आले. यावेळी त्यांनी लाठीचार्ज किंवा अटक झाली तरी ते आंदोलन थांबवणार नाहीत. आम्ही उद्यापर्यंत बसून राहू, असे स्पष्ट केले. मात्र, पोलीस प्रशासनाने केवळ शनिवार संध्याकाळपर्यंतच परवानगी दिली होती.

सीजेपीने जंतरमंतरवरील आंदोलनावेळी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे पोस्टरही मंचावर लावले. ‘जर थाळ्या वाजवून कोरोना विषाणू नाहीसा होत असेल, तर आपल्या पदाला चिकटून बसलेल्या शिक्षणमंत्र्यांना पुन्हा थाळ्या वाजवून हटवले पाहिजे.’ असे दीपके म्हणाले. यापूर्वी त्यांनी 6 जून रोजी जंतर मंतरवर आंदोलन केले होते. दिल्लीनंतर पुणे, लखनौ, अमृतसर, हैदराबाद, बेंगळूर, जयपूर आणि नागपूर येथेही आंदोलने करण्यात आली होती.

Comments are closed.