ठाकरे गट ओमराजे निंबाळकरांचं मन वळवणार? मध्यरात्री दोन आमदार अचानक पुण्यातील घरी भेटायला पोहोचल

ओमराजे निंबाळकर ऑपरेशन टायगर: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेले ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेने आता नवा सस्पेन्स तयार झाला आहे. ओमराजे निंबाळकर यांचे दिवंगत वडील पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar Murder) हत्या खटल्याचा निकाल काल निंबाळकरांच्या विरोधात गेला. या हत्याप्रकरणातील आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर आरोपींना सीबीआय कोर्टाने निर्दोष सोडले होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी मी अद्याप शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, दोन दिवसांत मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी हा निर्णय घेईन, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर आदित्य ठाकरे आणि खासदार अनिल देसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांना परतायचे असल्यास सकारात्मक विचार केला जाईल, असे संकेत दिले होते. या सगळ्यानंतर शनिवारी रात्री पुण्यात एक महत्त्वाची घडामोड घडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आणि आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil)  यांनी काल मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याचे समजते. या नव्या ट्विस्टमुळे ऑपरेशन टायगरबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटासोबत राहिल्यास उर्वरित पाच फुटीर खासदारांना स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही आणि त्यांच्या पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होऊ शकते. (Operation Tiger news)

प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री उशिरा आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेत त्यांची मनधरणी केल्याची चर्चा आहे. या दोघांनी ओमराजे निंबाळकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. खासदार ओमराजे निंबाळकर रविवारी सकाळी 8 वाजता पुण्याहून धाराशिवच्या दिशेने रवाना होणार आहेत. आज दुपारी बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलून ओमराजे निंबाळकर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. पवनराजे हत्याकांड निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदा ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार आहेत. आज दुपारी चार वाजता गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी कार्यकर्ते आणि जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन ओमराजे निंबाळकर पक्षांतराबाबतचा अंतिम निर्णय घेतील. ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात जाणार ही बातमी पसरल्यानंतर धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून त्यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत बैठकीत कार्यकर्त्यांची मते, सूचना ऐकून घेऊन ओमराजे निंबाळकर आजच भूमिका जाहीर करण्याची शक्यता  आहे.

ठाकरे गटाकडून अलीकडेच सर्व खासदारांना संसदीय गटाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हीप बजावला होता. या बैठकीला सहा फुटीर खासदार उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे ठाकरे गटाने या फुटीर खासदारांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, सहापैकी फक्त 5 खासदारांनाच ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस न बजावण्यात आलेला एकमेव खासदार कोण, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अशातच आता वरुण सरदेसाई आणि कैलास पाटलांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याने ते काही वेगळा निर्णय घेणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

आणखी वाचा

ओमराजेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा प्रतिसाद; खासदार फोडाफोडीमागचं राज’कारण’ही सांगितलं, अमित शाहांनाही प्रत्युत्तर

Comments are closed.