आमचे अकाऊंट हॅक कराल, बंद कराल, पण लोकांच्या मनात, युवकांच्या मनात जो राग आहे, तो कसा बंद करणार
झुरळ जनता पार्टी अभिजीत दिपके: सोशल मीडियावरून सुरू झालेल्या एका आगळ्यावेगळ्या राजकीय प्रयोगामुळे सध्या राज्यासह देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (Cockroach Janta Party) जोरदार चर्चा सुरू आहे. या पक्षाचे संस्थापक आणि पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी एबीपी माझाशी बोलताना सत्ताधारी आणि सरकारी यंत्रणांवर थेट शब्दांत हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावरील वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, “आमचे अकाऊंट हॅक कराल, बंद कराल, पण लोकांच्या मनात, युवकांच्या मनात जो राग आहे, तो कसा बंद करणार?” असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एबीपी माझाशी बोलताना अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची पार्श्वभूमी आणि पुढील वाटचालीवर खालीलप्रमाणे रोखठोक मते मांडली आहेत. आम्ही काही प्लॅन करुन कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली नाही. सरन्यायाधीशांनी वक्तव्य केल्यामुळे ही पार्टी स्थापन झाली. माझे सवाल सर्व यंत्रणांना आहेत. आज भाजप सत्तेत आहे, तर त्यांना प्रश्न विचारले जाणार. यंत्रणेशी छेडछाड करणाऱ्या प्रत्येक पक्षाला प्रश्न विचारले जाणार. आपल्या देशात लोकशाहीचा उलटा प्रवास सुरु आहे. सरकार ठरवत आहे मतदान कोणी करायचं, कोणी नाही. याआधी लोक ठरवायचे कोणतं सरकार सत्तेत बसेल आणि कोणतं नाही,” असे त्यांनी म्हटले.
झुरळ जनता पार्टी अभिजीत दिपके: आमचा पक्ष अपघाताने तयार झाला
कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार का? पक्षाची पुढील राजकीय वाटचाल काय असेल? या प्रश्नावर बोलताना अभिजीत म्हणाले की, आता इतक्यात काही सांगणं अवघड आहे. आमची चार दिवसांची पार्टी आहे. आम्ही काहीही ठरवून केलेलं नाही. आमची पार्टी ही अपघाताने निर्माण झालेली पार्टी आहे. त्यामुळे इतक्यात आम्ही कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणे कठीण आहे. आमचे 1 कोटी फॉलोअर्स झाले आहेत, आधी त्यांची मतं जाणून घेऊ, त्यांच्याशी संवाद साधू ही आमची प्राथमिकता आहे. त्यांच्या अपेक्षा काय, त्यांचे प्रॉब्लेम्स काय हे जाणून घेऊ. जोपर्यंत आम्ही ते समजून घेऊ शकत नाही, तोपर्यंत निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही. पण हे आंदोलन मोठं होणार आणि देशाचं राजकारण बदलणार हे नक्की.”
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: …तर उद्या दुसऱ्या माध्यमातून तरुणाई राग व्यक्त करेल
तसेच, अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत, असा दावा देखील केलाय. “आमच्याकडून जी पावले उचलायची आहेत ती पावले आम्ही उचलत आहोत. मात्र आम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आमचे अकाऊंट हॅक कराल, बंद कराल, पण लोकांच्या मनात, युवकांच्या मनात जो राग आहे, तो कसा बंद करणार, तो कसा दाबाल? आज आमचं अकाऊंट बंद केलात तर उद्या दुसऱ्या माध्यमातून तरुणाई राग व्यक्त करेल,” असे देखील अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.
Who is Abhijeet Dipke: कोण आहेत अभिजीत दिपके?
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि संयोजक अभिजीत भगवानराव दिपके हे मूळचे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर-1 परिसरातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील भगवान शंकर दिपके हे वाळूज एमआयडीसीमध्ये उपभियंता पदावर कार्यरत होते आणि सुमारे एक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत, तर आई अनिता दिपके या गृहिणी आहेत.
अभिजीत यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे ब्रॉडकास्ट जर्नलिझम या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढील उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले असून सध्या बोस्टन विद्यापीठात (Boston University) जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. राजकीय नॅरेटिव्ह तयार करणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यांनी 2020 ते 2023 या कालावधीत आम आदमी पार्टीच्या (AAP) सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले असून, दिल्ली निवडणुकीत भाजपच्या एका घोषणेला उत्तर म्हणून त्यांनी चालवलेले “देश के गवारों को, स्कूल भेजो सारों को” हे सोशल मीडिया कॅम्पेन अत्यंत गाजले होते.
Cockroach Janta Party Manifesto: जाहीरनाम्यातील आक्रमक भूमिकांमुळे चर्चा
कॉक्रोच जनता पार्टीचा जाहीरनामा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सरन्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर राज्यसभेची जागा न देणे, मतदानाचा हक्क हिरावून घेतल्यास कठोर कारवाई, महिलांना 50 टक्के आरक्षण, पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर 20 वर्षांची बंदी आणि माध्यम क्षेत्रातील मोठ्या उद्योगसमूहांच्या मालकीबाबत कठोर भूमिका, अशा अनेक आक्रमक तरतुदी या जाहीरनाम्यात मांडण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.