पक्ष बदलणाऱ्या आमदार-खासदारांवर 20 वर्षे बंदी, महिलांना 50 टक्के आरक्षण; कॉकरोच जनता पार्टीच्या

झुरळ जनता पक्षाचा जाहीरनामा: देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या 6 दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर 100 लाख (10M) फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकलं. तर काही तासांत काँग्रेसच्या फॉलोअर्सलाही कॉकरोच जनता पार्टी मागे टाकणार असल्याचं दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) या मराठी मुलाने स्थापन केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चा (सीजेपी) कलमी जाहीरनामा (Cockroach Janta Party Manifesto) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया, महिला आरक्षण, माध्यम स्वातंत्र्य आणि पक्षांतर यांसारख्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या या जाहीरनाम्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. महिला सक्षमीकरणावर भर देत संसदेत महिलांना 33 टक्क्यांऐवजी 50 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे.

एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार किंवा खासदारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव- (Cockroach Janta Party Manifesto)

कॉकरोच जनता पार्टीने जाहीरनाम्यात केंद्र आणि राज्यातील कॅबिनेट मंत्रीपदांपैकी निम्मी पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची भूमिकाही मांडण्यात आली आहे. माध्यम स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही सीजेपीने थेट भूमिका घेतली आहे. अंबानी आणि अदानी समूहांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असून, तथाकथित  मीडिया’ अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी करण्याची मागणीही कॉकरोच जनता पार्टीने जाहीरनाम्यातून केली आहे. राजकीय पक्षांतर रोखण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार किंवा खासदारांना 20 वर्षे निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्याचा प्रस्तावही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात काय काय? (Cockroach Janta Party Manifesto)

  1. कोणत्याही सरन्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर राज्यसभेची जागा किंवा अन्य राजकीय बक्षीस दिले जाणार नाही.
  2. नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणे हे दहशतवादासमान गंभीर गुन्हा मानला जाईल. कोणतेही वैध मत वगळल्यास संबंधित मुख्य निवडणूक आयुक्तांवर यूएपीए अंतर्गत कारवाई केली जाईल.
  3. संसदेत महिलांना 33 टक्क्यांऐवजी 50 टक्के आरक्षण दिले जाईल. तसेच सर्व कॅबिनेट मंत्रीपदांपैकी 50 टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवली जातील.
  4. माध्यम स्वातंत्र्यासाठी अंबानी आणि अदानी समूहांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील. तथाकथित ‘गोदी मीडिया’ अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल.
  5. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या कोणत्याही आमदार किंवा खासदाराला 20 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक मराठी, कोण आहेत अभिजीत दीपके? (Who Is Abhijeet Dipke)

दरम्यान, या पक्षाचे संस्थापक अभिजीत भगवानराव दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील रहिवासी आहेत. 30 वर्षीय अभिजीत यांनी पुण्यातून ब्रॉडकॉस्ट जर्नलिझमचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही काम करत असून, राजकीय नॅरेटिव्ह तयार करणे, सार्वजनिक संवाद आणि डिजिटल माध्यमांद्वारे मतप्रवाह घडवणे यावर त्यांचा अभ्यास केंद्रित आहे. अभिजीत दीपके यांनी 2020 ते 2023 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. विशेषतः 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी मीम्सआधारित डिजिटल प्रचारावर काम केले. भाजपच्या ‘देश के गद्दारों को गोली मारो सालों को’ या घोषणेवर प्रत्युत्तर म्हणून ‘देश के गवारों को, स्कूल भेजो सारों को’ हे सोशल मीडिया कॅम्पेन राबवण्यात आले होते. त्या मोहिमेतही अभिजीत यांचा सहभाग होता.

संबंधित बातमी:

Cockroach Janta Party Who Is Abhijeet Dipke: मराठी मुलाने सुरु केलेली कॉकरोच जनता पार्टी काय आहे?; फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही टाकलं मागे

आणखी वाचा

Comments are closed.