नवी मुंबईतील नालेसफाईची आयुक्तांनी घेतली झाडाझडती; १५ मेपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सुरू असलेल्या नालेसफाईची महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज झाडाझडती घेतली. गेल्या वर्षी पाऊस पंधरा दिवस लवकर सुरू झाला होता. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच कामे पूर्ण करण्याची डेडलाईन ३१ मेऐवजी १५ मे ही ठेवण्यात यावी आणि याच मुदतीत कामे व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी यावेळी प्रशासनाला दिले.

पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिघा येथून नालेसफाईच्या कामांची आज पाहणी सुरू केली. त्यांच्या समवेत शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ १ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, उद्यान विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे तसेच संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी उपस्थित होते. नालेसफाई करताना सुरुवातीच्या उगमापासून खाडीपर्यंत व्यवस्थित सफाई करून घ्यावी व गाळाचा अंदाज घेऊन त्या प्रमाणात जेसीबी व पोकलेनचा उपयोग करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

अडथळे हटवण्याच्या प्राधिकरणांना सूचना पावसाळ्यात नवी मुंबई शहरात पाणी तुंबू नये यासाठी महापालिका
प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एका ठिकाणी भराव टाकण्यात आला असून तो तातडीने हटवण्याच्या सूचना संबंधित प्राधिकरणाला दिल्या आहेत. एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, सिडको, एमएमआरडीए, एपीएमसी अशा सर्व प्राधिकरणांची समन्वय बैठक पुढील आठवड्यात घेतली जाईल, असेही आयुक्त यावेळी म्हणाले.

Comments are closed.