Kokan News – कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाचे धडे; आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये दिल्लीतील भारतीय हवाई दलातर्फे “इंडक्शन पब्लिसिटी प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाचे कामकाज व रोजगाराच्या उपलब्ध संधींची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्याचा व विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे प्रेरित करण्याचा यामागे मुख्य उद्देश होता. याच अनुषंगाने हवाई दलाच्या अधिका-यानी फ्लाईट सिमुलेटर तसेच अन्य सलग्न साधन यंत्रांनी सुसज्य बनविलेल्या इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेइकलद्वारे (IPEV) विद्यार्थ्यांना हवाई दलाच्या कामकाजाचे प्रात्यक्षिक दाखविले.

सुरुवातीला संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर करण त्यागी आणि फ्लाईंग ऑफिसर सितीज सिंघ रावत या अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलातील प्रशिक्षण व जीवन, भारतीय हवाई दलातील संधी, फ्लाईट सिमुलेटर याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्येही हवाई दलाबद्दल असणारे कुतूहल दिसून आले. विद्यार्थ्यांनी यावेळी विचारलेल्या सर्व शंकांचे यावेळी उपस्थित हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी निरसन केले. बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

Comments are closed.