मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने खळबळ
जळगाव : शहरातील (Jalgaon) शनिपेठ पोलीस स्टेशन लाचखोरी (Bribe) प्रकरणी पोलिस नाईकास थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. तर पोलिस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडका फडकी बदली करण्यात आल्याने जिल्ह्याच्या पोलिस दलात खळबळ उडाली. तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना पोलीस ठाण्याच्या आवारातच विनोद अहिरे या कर्मचाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती. याप्रकरणी, अहवाल प्राप्त होताच संबंधित पोलीस नाईकावर थेट बडतर्फीची कठोर कारवाई करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यावरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कारवाईबाबतचे आदेश काढले आहेत. दाखल तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी आरोपीकडून एक लाख रुपयांची लाच घेताना पकडलेल्या पोलिस नाईक विनोद पितांबर अहिरे यांना थेट पोलिस दलातून थेट बडतर्फ करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच ही कारवाई केली होती. या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने बडतर्फीचे आदेश काढले. साधारणतः अशा प्रकरणांमध्ये निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, थेट बडतर्फी झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक कावेरी कमलाकर यांना देखील तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने तब्बल 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर 13 एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान आरोपीने पंचासमक्ष 1 लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्यानुसार, 1 लाख रुपये घेत असताना एसीबीच्या पथकाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं होतं. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तत्काळ तक्रार करावी. भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.
तक्रार चौकशीची जबाबदारी पोलिस नाईकाकडे देणे, त्यावर लक्ष न ठेवणे आणि कामातील निष्काळजीपणा पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना भोवला आहे. दरम्यान, विनोद अहिरे यांच्याविरोधात यापूर्वीही गंभीर तक्रारी असल्याची माहिती समोर आली असून या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.