लँडिंग दरम्यान विमानाचा टायर फुटल्याने गोंधळ
छत्तीसगडमधील विलासपूरमध्ये मोठी दुर्घटना टळली : सुदैवाने 35 प्रवासी सुरक्षित
वृत्तसंस्था/ विलासपूर
छत्तीसगडमध्ये शुक्रवारी विलासपूरच्या विलासा विमानतळावर एक मोठा अपघात टळला. दिल्लीहून आलेल्या अलायन्स एअरच्या विमानाचा धावपट्टीवर उतरताना अचानक टायर फुटला. सुदैवाने, या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. विमानातील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीहून विलासपूरला जात होते. लँडिंग करताना विमानाचा टायर फुटल्यामुळे पूर्णपणे निकामी झाला. टायर फुटल्यामुळे विमानतळावर काही काळासाठी घबराट पसरली. मात्र, वैमानिकाच्या तत्परतेमुळे विमान सुरक्षितपणे उतरल्याने विमानातील सर्व 35 प्रवाशांचे जीव वाचले. विमानतळ प्रशासन आता लँडिंग दरम्यान टायर फुटण्याच्या मूळ कारणाचा तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरचे विमान शुक्रवारी सकाळी सुमारे 10:55 वाजता दिल्लीहून विलासपूरसाठी निघाले होते. सुमारे अडीच तासांच्या प्रवासानंतर, विमान विलासा देवी केवट विमानतळावर उतरत असताना लँडिंगदरम्यान त्याचा उजवा टायर अचानक फुटला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे विमानतळ प्रशासन आणि विमानातील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. टायर धावपट्टीवर आदळताच विमान काही अंतरापर्यंत घसरल्याने आगीच्या ठिणग्याही उडाल्या. या दृश्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, वैमानिकाने तात्काळ नियंत्रण मिळवले आणि विमान सुरक्षितपणे थांबवले. जर विमान वेळेवर नियंत्रणात आणले नसते, तर एक मोठी दुर्घटना घडू शकली असती. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे आणि अनुभवामुळे सर्व प्रवासी बचावले आणि एक संभाव्य दुर्घटना टळली. या घटनेनंतर तात्काळ, विलासपूर ते प्रयागराज जाणारे पुढील विमान रद्द करण्यात आले.
Comments are closed.