दुलिप ट्रॉफीचे दोन्ही अंतिम संघ निश्चित, ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्यात रंगणार जेतेपदाची लढत

दुलीप ट्रॉफी 2026 च्या फायनलमधील दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. ईस्ट झोनच्या संघाने पहिल्या उपांत्य फेरीत सेंट्रल झोनचा पराभव करून फायनलमधील आपले स्थान आधीच पक्के केले होते. आता साउथ झोनने नॉर्थ झोनला नमवून फायनलमधील जागा निश्चित केली आहे. म्हणजेच आता फायनलच्या सामन्यात ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या नेतृत्वाखालील संघ आमनेसामने असतील.

​तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील साउथ झोनच्या संघाने उपांत्य फेरीत कन्हैया वधावनच्या नेतृत्वाखालील नॉर्थ झोनच्या संघाचा सात विकेट्सने पराभव करत दलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता ईस्ट झोन आणि साउथ झोन यांच्यातील अंतिम सामना 6 सप्टेंबरपासून एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करत इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे फायनलचा सामना अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. जो संघ उत्तम खेळ करेल, तो या चषकावर आपले नाव कोरेल.

​साउथ झोनला फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा कर्णधार तिलक वर्मा याचा मोठा वाटा राहिला. उपांत्य फेरीत पहिल्या डावात त्याने 166 धावांची नाबाद खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यावरही त्याने 51 धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले. दुसरीकडे ईस्ट झोनच्या संघात कर्णधार ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांच्यासोबतच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील खेळत आहे.

​या वर्षीच्या दलीप ट्रॉफीची सुरुवात 23 ऑगस्टपासून झाली होती. आता फायनलचे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. ईशान किशन त्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत एकही देशांतर्गत सामना हारलेला नाही. त्यामुळे फायनल जिंकण्यासाठी तो प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे, तिलक वर्माने ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे, ते पाहता तो सहज ट्रॉफी हातची जाऊ देईल असे वाटत नाही. थोडक्यात सांगायचे तर, फायनलचा सामना अत्यंत चुरशीचा आणि धमाकेदार होण्याची पूर्ण शक्यता आहे.

Comments are closed.