काँग्रेस नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे (93) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सुना, नातवंडे असा परिवार आहे. थोपटे यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. 1972 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर 1983 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांच्यावर पहिल्यांदा राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज, संसदीय कार्य खात्यांचा कारभार सक्षमपणे पेलला. 1990 च्या काळातच पुणे जिह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 1999 ते 2000 या काळात महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. 1999 साली थोपटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव झाला नसता व काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली असती तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.
महानंद डेअरीची स्थापना
थोपटे यांनी दुग्धविकास राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी त्यावेळी दूधाचा महापूर योजना कार्यान्वित केली. महानंद डेअरीचा प्रारंभ त्याच काळात झाला. या संस्थेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषविले. थोपटे यांनी दत्त दिगंबर सहकारी वाहतूक कामगार संस्था 1975 मध्ये स्थापन केली.
कुस्तीत पाच सुवर्णपदके
अनंतराव थोपटे यांनी 1952 ते 1957 या काळात अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियनशिप कुस्तीमध्ये सलग 5 कर्षे सुवर्णपदक मिळवले.
Comments are closed.