वर्ल्ड कपच्या नावाखाली फॅन्सची तहान विकली, फिफाचे फॅन्सविरोधी बाटलीबंदीचे तुघलकी फर्मान

फुटबॉल म्हणजे श्वास आणि आता फिफा म्हणतेय, ‘श्वास घ्या, पण पाणी पिऊ नका’! 2026 च्या फिफा वर्ल्ड कपला आता अवघे सात दिवस बाकी असताना फिफाने फॅन्सच्या तोंडचं पाणी पळवणारा निर्णय घेतलाय. स्टेडियममध्ये आता तुमची स्वतःची पुन्हा वापरता येणारी पाण्याची बाटली न्यायला बंदी घालण्याचे फिफाने तुघलकी फर्मान काढले आहे. या बंदीच्या निर्णयाबाबत चाहत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

गेल्या महिन्यापर्यंत फिफाच ‘हो’ म्हणत होती की, एक लिटरची रिकामी, पारदर्शक बाटली चालेल. पण आता लागू केलेल्या नव्या नियमाने फॅन्सच्या हक्कांवर थेट घाव घातलाय. कारण काय? ‘सेफ्टी’. बाटल्या, कप, पॅन या सर्वांवर सरसकट बंदी.  फिफाचं म्हणणं आहे, ‘खेळाडूंवर किंवा फॅन्सवर फेकून मारली तर?’ अहो, पण तापलेल्या डोक्याला गार पाणीच नसेल तर फॅन्स काय फेकणार?

'हायड्रेशन स्टेशन'च्या नावाखाली लुटमार?

फिफाचं ठरलंय की मैदानाबाहेर मिस्टिंग स्टेशन, कूलिंग टेंट लावणार आणि आतमध्ये पाण्याच्या बाटलीची किंमत इतर इव्हेंटसारखीच असेल. म्हणजे काय? जिथे 26 ते 28 डिग्रीची आग ओकणारी उन्हं असतील, तिथे 20 रुपयाची बाटली 200 ला विकणार? अमेरिकेत, कॅनडात, मेक्सिकोत जून-जुलैच्या रणरणत्या उन्हात 90 मिनिटं ओरडणाऱ्या फॅन्सच्या घशाला कोरड पडली तर जबाबदार कोण? आरोग्य आणि सुरक्षेच्या नावाखाली फॅन्सच्या खिशाला जबरदस्त कात्री लावण्याचा फिफाचा प्लॅन आहे.

हे सुरक्षा नव्हे, धंदेवाईक मताधिकार

फुटबॉल फॅन्सचा संताप आता उफाळून आलाय. बाहेरची बाटली आणली तर सेफ्टीला धोका, पण आतमध्ये तीच बाटली विकत घेतली तर धोका नाही का, हा सवाल प्रत्येक स्टँडवरून घुमतोय. आधी पर्यावरणासाठी रियुजेबल बाटल्यांचं गाजर दाखवलं आणि आता स्पॉन्सरचे कोल्ड्रिंक्स खपवण्यासाठी फॅन्सला वेठीस धरलं. 48 टीमचा वर्ल्ड कप, पण फॅन्सच्या बेसिक हक्काला 48 तासात तिलांजली दिली गेली. चाहत्यांचे तोंडचे पाणी पळवणारी ही स्पर्धा 11 जून ते 19 जुलैदरम्यान खेळवली जाणार असून, हा वर्ल्ड कप इतिहासात ‘तहानलेला वर्ल्ड कप’ म्हणून तर नोंदला जाणार नाही ना असा चाहत्यांना प्रश्न पडलाय.

Comments are closed.