दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, पुढे आलं राज’कारण’
मुंबई : राज्यसभेच्या (Rajyasabha) महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 16 मार्च रोजी मतदान घेण्यात येत आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ एकच जागा येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे निवृत्त होत असल्याने ती जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रह केलाय. तर, सर्वाधिक संख्याबळ असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेनंही या जागेवर दावा केला आहे. मात्र, काँग्रेसही राज्यसभेच्या या एका जागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसने (Congress) महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर दावा केल्याची माहिती आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रणुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून ही जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती केली असून, त्याबदल्यात विधान परिषदेची रिक्त होणारी जागा स्वतः उद्धव ठाकरेंना देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळं राष्ट्रीय पातळीवर इंडिया अलायन्स तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी टिकवण्यासाठी मदत होईल, असा काँग्रेसचा आग्रह आहे. राज्यसभेचं विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे ठेवण्यासाठी काँग्रेसला महाराष्ट्रातील एका जागेची आवश्यकता आहे.
राज्यसभेचे नेमकं गणित काय आहे?
राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी त्या पक्षाकडे एकूण सदस्यसंख्येच्या किमान 10% जागा (म्हणजेच 25 सदस्य) असणे बंधनकारक आहे. सध्या काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत. मात्र, यावर्षी होणाऱ्या 72 जागांच्या निवडणुकीनंतर हे संख्याबळ 25 च्या खाली जाण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे. विशेषतः जूनमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांचे पद वाचवण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. याशिवाय महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्याने, ती जागा पुन्हा जिंकणे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे आणि तांत्रिकदृष्ट्या गरजेचे बनले आहे.
राज्यसभेची एकूण सदस्य संख्या : 245
विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक (10%) : 25
काँग्रेसचे संख्याबळ : 27
निवडणुकीचे टप्पे : 16 मार्च (37 जागा), 24 जून (24 जागा), 11 नोव्हेंबर (11 जागा)
काँग्रेससमोरील अडचण :
पहिल्या टप्प्यातील 37 जागांपैकी काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, रजनी पाटील, फुलोदेवी नेताम आणि केटीएस तुलसी या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. तसेच जूनमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचाही कार्यकाळ संपणार आहे. जर काँग्रेसने या निवडणुकांमध्ये आपल्या जागा राखल्या नाहीत, तर त्यांना राज्यसभेतील अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘विरोधी पक्षनेते’ पद गमवावे लागू शकते. म्हणूनच, महाराष्ट्रातील सुरक्षित असलेली जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार याबाबत काय प्रतिसाद देतात याकडे काँग्रेसचं लक्ष आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.