काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे निधन.

तिहार कारागृहात घेतला अखेरचा श्वास शीखविरोधी दंगल प्रकरणातील दोषी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे तिहार कारागृहात कैद असताना गुरुवारी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सकाळच्या सुमारास त्यांना सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, इस्पितळात दाखल होण्यापूर्वीच ते मृत झाल्याचे वैद्यकीय तपासणीअंती स्पष्ट झाले. 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील तीनपैकी दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यामुळे ते सध्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.

दिल्ली कॅन्टमधील पालम कॉलनी येथे पाच शिखांच्या हत्येप्रकरणी आणि गुरुद्वारा जाळल्याप्रकरणी सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने 17 डिसेंबर 2018 रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सप्टेंबर 2023 मध्ये राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने सुलतानपुरीतील तीन शिखांच्या हत्येप्रकरणी त्याची निर्दोष मुक्तता केली. 1 नोव्हेंबर 1984 रोजी सरस्वती विहार येथे सरदार जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुंदीप सिंग यांची हत्या झाली होती. या प्रकरणात सज्जन कुमारला 12 फेब्रुवारी 2025 रोजी दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सज्जन कुमार यांची राजकीय कारकीर्द

सज्जन कुमार यांचा जन्म 23 सप्टेंबर 1945 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रघुनाथ सिंग होते. त्यांचे शिक्षण फक्त मॅट्रिकपर्यंतच झाले होते. 1977 मध्ये सज्जन कुमार पहिल्यांदा दिल्ली महानगरपालिकेत नगरसेवक झाले. नंतर त्यांची दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 1980 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर बाह्य दिल्ली मतदारसंघातून सातव्या लोकसभेवर निवडून आले. 1991 मध्ये त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकली. ते संजय गांधींच्या जवळचे मानले जात होते. 2004 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा बाह्य दिल्लीची जागा 85 लाखांहून अधिक मतांच्या विक्रमी फरकाने जिंकली होती.

Comments are closed.