काँग्रेसच्या हनुमंत पवार यांना तुषार दामगुडे आणि साथीदारांकडून मारहाण, पोलिसांनी दिली नवी अपडेट
पुणे : एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डिबेट शोसाठी ते संबंधित ठिकाणी गेले असताना तुषार दामगुडे आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Hanumant Pawar : हनुमंत पवार काय म्हणाले?
मी एका वृत्तवाहिनीच्या डेबिट शोला गेलो होतो तिथं मी भाजपच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता त्याची आठवण करून दिली आणि याचाच राग या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना आला, असं हनुमंत पवार म्हणाले.
बाहेर आल्यानंतर मला धमकवण्यात आलं हर्षवर्धन सपकाळ याबद्दल बोललो तर तुला राग का येतो असं म्हणतं कमरेला बघ पिस्टल आहे, अशा पद्धतीने धमकवण्यात आलं, असं हनुमंत पवार म्हणाले.
मी अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि अशा पिस्टलला देखील घाबरत नाही असं बोलल्यानंतर थेट त्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्या छातीवर आणि तोंडावर जोरदार मार बसला आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे ही कुठली पद्धत आहे, असं हनुमंत पवार म्हणाले.
डिबेट झाल्यानंतर बाहेर आलो, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत बोलत होतो. तुषार दामगुडे यानं शिवीगाळ केली, असा आरोप देखील हनुमंत पवार यांनी केला. भाजपच्या विरोधात का बोलतो असं म्हणत कमरेच्या उजव्या बाजूला असलेलं पिस्तूल त्यानं दाखवलं, असंही हनुमंत पवार म्हणाले. तुषार दामगुडेच्या चार पाच सहकाऱ्यांनी मारहाण केली. पुण्यात जिवंत फिरायचं असेल तर भाजप विरोधात बोलायचं नाही, अशी धमकी देखील त्यांनी दिली, असं हनुमंत पवार म्हणाले.
पोलीस काय म्हणाले?
डीसीपी मिलिंद मोहिते यांनी तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार यांच्यात बाचाबाची झाली. तिथं असलेल्या चार ते पाच लोकांनी हनुमंत पवार यांना मारहाण केलेली आहे. या संदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे, असं मिलिंद मोहिते म्हणाले. तुषार दामगुडेचे ते सगळे मित्र आहेत. दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचं देखील मोहिते यांनी सांगितलं.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाचे तरुण प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुणे शहरातील मित्रमंडळ चौक येथे झालेली हल्ल्याची घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. भाजपशी संबंधित गुंड तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत केलेला हा हल्ला लोकशाही मूल्यांवरचा थेट आघात आहे. वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु दहशत आणि हिंसाचाराच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय संवाद या लोकशाहीच्या मूलभूत आधारस्तंभांवर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. भाजपच्या या गुंडांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले पाहिजे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. गुंड प्रवृत्तीला पाठीशी न घालता आळा घालणे ही सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई केली पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.