बागलकोट आणि दावणगेरे दक्षिणमध्ये काँग्रेसचा विजय

उमेश मेटी, समर्थ शामनूर यांनी प्रतिस्पर्ध्यांना चारली पराभवाची धूळ :

टी. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

राज्यात बागलकोट आणि दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व राखले आहे. बागलकोटमध्ये अपेक्षेपेक्षा जात मते मिळवत विजय संपादन केला. तर दावणगेरे दक्षिणमध्ये विजयासाठी झगडावे लागले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी यांनी भाजपच्या वीरण्णा चरंतीमठ यांना पराभवाची धूळ चारली. याद्वारे त्यांनी वडील दिवंगत आमदार एच. वाय. मेटी यांचे उत्तराधिकारी म्हणून राजकारणात प्रवेश केला आहे. दुसरीकडे दावणगेरे मतदारसंघातही काँग्रेसच्या समर्थ शामनूर यांनी भाजपच्या श्रीनिवास दासकरियप्पा यांना पराभूत करत मतदारसंघावरील पक्षाचे वर्चस्व अबाधित राखले आहे.

सोमवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांसोबतच बागलकोट व दावणगेरे दक्षिण मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून सत्ताधारी काँग्रेसने दोन्ही जागा जिंकल्या. दिवंगत आमदार एच. वाय. मेटी आणि शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बागलकोट व दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघांसाठी 9 एप्रिल रोजी मतदान झाले होते. बागलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार वीरण्णा चरंतीमठ यांनी उमेश मेटी यांना कडवी झुंज दिली. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी यांनी त्यांना 22,332 मतफरकाने पराभवाची धूळ चारली. उमेश मेटी यांना 98,919 मते पडली. तर चरंतीमठ यांना 76,487 मते मिळाली.

2004, 2008 आणि 2018 मध्ये विजयी झालेल्या वीरण्णा चरंतीमठ यांना 2023 च्या विधानसभा निवडणुकीत एच. वाय. मेटी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. आता पोटनिवडणुकीतही पराभव झाल्याने भाजपला धक्का बसला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना येथे विजयाचा विश्वास होता. परंतु, त्यांची निराशा झाली आहे.

दावणगेरेत काँग्रेस उमेदवाराला केवळ 5708 मताधिक्य

बंडखोरी आणि काँग्रेस नेत्यांमधील दुफळीमुळे कुतूहल निर्माण झालेल्या दावणगेरे दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे समर्थ शामनूर यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे श्रीनिवास दासकरियप्पा यांना 5708 मतांनी पराभूत केले. समर्थ यांना 69,578 मते मिळाली, तर श्रीनिवास दासकरियप्पा यांना 63,870 मते पडली. एसडीपीआयचे उमेदवार अप्सर कोडलीपेटे यांना सुमारे 18,975  मते मिळवत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.

दावणगेरेमध्ये 24 फेऱ्यांत मतमोजणी झाली. मतमोजणीच्या पहिल्या 7 फेऱ्यांमध्ये समर्थ शामनूर पिछाडीवर होते. पण, आठव्या आणि नवव्या फेरीतील मतमोजणीनंतर चित्र पालटले. त्यानंतर समर्थ शामनूर यांनी आघाडी कायम ठेवली. परंतु. आघाडीतील मतांचे अंतर कमी होते. 24 व्या फेरीची मतमोजणी संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची आनंदोत्सव साजरा केला.

दोन्ही मतदारसंघांत झाले होते 68 टक्के मतदान

राज्यातील बागलकोट आणि दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघांत 9 एप्रिल रोजी   मतदान झाले होते. बागलकोटमध्ये 68.74 टक्के तर दावणगेरे दक्षिणमध्ये 68.43 टक्के मतदान झाले होते. दावणगेरे मतदारसंघातील निकालाकडे अनेकांचे लक्ष होते. मतदारसंघातील मुस्लीम नेत्यांच्या भूमिकेवर येथील निकाल अवलंबून होता. अखेर मतदारसंघात घराण्याचे वर्चस्व असून देखील काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ 5708 मताधिक्य मिळविता आले.

बागलकोटमधील काँग्रेसच्या विजयाची कारणे

बागलकोटमध्ये दिवंगत आमदार एच. वाय. मेटी यांच्या चारही मुलांमध्ये काँग्रेसच्या तिकिटासाठी चढाओढ होती. अखेर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चौघांनाही बेंगळूरला बोलावून घेत चर्चा केली. उमेश मेटी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिद्धरामय्यांच्या सल्ल्यानुसार मेटी कुटुंबीयांनी एकजूट दाखवत प्रचार केला, याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. भाजप उमेदवार वीरण्णा चरंतीमठ यांनी “मला मुस्लीम समुदायाची मते नकोत”, असे वक्तव्य केले होते. बागलकोटमध्ये कुरुब, लिंगायत मतांनंतर मुस्लीम समुदायाची अधिक मते आहेत. असे असताना चरंतीमठ यांनी केलेले वक्तव्य भाजपला मारक ठरल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी पक्षाचा प्रभाव आणि अनुकंपा हे मुद्देही उमेश मेटी यांना जमेची बाजू ठरले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मंत्री सतीश जारकीहोळी व आर. बी. तिम्मापूर यांनी पायाला चाके लावल्याप्रमाणे मतदारसंघात जोरदार प्रचार केला. याचा लाभ काँग्रेस उमेदवाराला झाला.

 

Comments are closed.