मीरा-भाईंदर पालिकेच्या 150 अग्निशमन जवानांचे भविष्य चिंतेने होरपळले, सात वर्षांपासून कायम नोकरीच्या प्रतीक्षेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शहरात आग, दुर्घटना किंवा नागरिक संकटात सापडले की स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीला धावणारे मीरा-भाईंदर पालिकेतील अग्निशमन जवानच आज आपल्या भविष्याच्या चिंतेने होरपळत आहेत. 150 कंत्राटी कर्मचारी गेल्या सात वर्षांपासून अविरत सेवा बजावत असतानाही कायम नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. समान काम, समान जबाबदारी मात्र वेतनात तफावत, पगाराची अनियमितता, थकबाकी, वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि सेवेत कायम होण्याची अनिश्चितता अशा समस्यांनी या कर्मचाऱ्यांना ग्रासले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेत 150 कर्मचारी ठेकेदारामार्फत कार्यरत आहेत. कचरा डेपोवरील भीषण आगी विझवणे, धोकादायक इमारतींमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे, झाडांवर अडकलेल्या पक्ष्यांना बाहेर काढणे, विषारी साप पकडणे, धोकादायक झाडे हटवणे अशा जीवघेण्या मोहिमा हे कर्मचारी राबवतात. आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट आणि दुर्घटनांच्या ठिकाणी बचावकार्य करताना अनेक कर्मचाऱ्यांना दुखापतीही झाल्या आहेत. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पालिकेने अद्याप नोकरीत कायम केलेले नाही.

जीव धोक्यात घालून काम

अग्निशमन ही अत्यावश्यक सेवा असल्याने वेतन रखडले तरी कर्तव्यावर गैरहजर राहणे शक्य नसते. जीव धोक्यात घालून काम करायचे, पगारासाठी प्रतीक्षा करायची आणि आजारपणात उपचारांची चिंता करायची, अशी या कर्मचाऱ्यांची अवस्था झाली आहे. सात वर्षांच्या सेवेत त्यांनी प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा अनुभवही मिळवला आहे. मात्र अजूनही पालिकेने त्यांना पर्मनंट केलेले नाही.

Comments are closed.