AC शिवाय शीतलता

सध्या भारतभर प्रचंड उष्मा जाणवत आहे. विशेषत: सिमेंट-काँक्रिटच्या इमारतींमध्ये तर अक्षरश: उकडल्यासारखे होते. वातानुकुलीत यंत्रणेशिवाय अशा इमारतींमधील सदनिकांमध्ये राहणेही अशक्य होत असते. अशा स्थितीत उत्तर प्रदेशातील एक घर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या घराचे बांधकाम पक्के असूनही या घरात एसी नसतानाही थंडावा आहे. तसेच हिंवाळ्यात आणि ऐन थंडीतही या घरात वातावरण ऊबरदार राहते. या घराचे तापमान त्याच्या आसपासच्या घरांपेक्षा 5 ते 10 डिग्री कमी असते. एका विषेश तंत्रज्ञानाचा उपयोग करुन या घराची निर्मिती करण्यात आली आहे. हे घर उत्तर प्रदेश राज्याच्या सीतापूर येथे आहे. या घराचे मालक आहेत द्विजेंद्रनाथ गुरु. या घराचे नावही ‘सूर्य छाया’ असे वैशिष्ट्यापूर्ण आहे.

या घराच्या बांधकामात सिमेंटचा उपयोग अगदी कमी प्रमाणात करण्यात आला आहे. बांधकामाची साधनसामग्री मुख्यत: स्थानिक माती आणि चुना अशी आहे. घराचे छत आणि भिंती यांची रचना अशी आहे, की उष्ण हवा आपोआप बाहेर जाऊ शकेल. पावसाचे पाणी साठविण्यासाठी 17 हजार लीटरच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. तीव्र उष्म्यातही या घरात एसी किंवा कूलरची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे वीजेचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचतो. या घराची रचना करताना अनेक प्रकारची तंत्रे आणि साधने उपयोगात आणण्यात आली आहेत. स्थानिक गवंडी आणि मिस्त्री यांनी हे घर बांधण्यासाठी हे तंत्रज्ञान आधी शिकून घेतले. पूर्वीच्या घरांच्या बांधकामांमध्ये याच तंत्रज्ञानाचा उपयोग होत असे. तथापि, काळाच्या ओघात अशी घरे बांधणारे लोक दुर्मिळ होत गेले. पण आता जगाचेच तापमान वाढीला लागल्यामुळे पुन्हा या जुन्या तंत्रज्ञानाला चांगले दिवस येत आहेत. हे घर आकाराने मोठेही आहे. त्याच्या दिवाणखान्यात 60 ते 70 लोक सहजगत्या मावू शकतात.

Comments are closed.