कपाशीला मर रोगाचा विळखा
पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादन घटलेल्या कपाशी पिकाला आकस्मिक मर रोगाचा विळखा पडल्याने शेतकऱ्याची अवस्था चोहोबाजूने अडचणीत सापडल्यासारखी झाली आहे.
उसाला पर्याय पीक म्हणून राहुरी तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. मागील वर्षी तालुक्यात 18 हजार 500 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा 22 हजार हेक्टरपर्यंत कपाशीची लागवड झाली आहे. जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कापूस वेचणीचे काम महिन्याभरापासून सुरू आहे. जुलै महिन्यात कपाशीच्या एका झाडाला तब्बल 100 कैरी लागल्याने यंदा या पिकाचे उत्पादन व उत्पन्न चांगले मिळेल, ही अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगली होती. मात्र, अचानक कपाशीला मर रोगाने विळखा घातल्याने झाडाच्या कैऱ्या वाळून गेल्या आहेत. या संकटाने यंदा कापूस पिकाचे उत्पादन 40 टक्क्याने घटले आहे. 2025 मध्ये कपाशी पिकाचे एकरी उत्पादन 15 ते 18 क्विंटलपर्यंत मिळाले होते. यंदा पावसाचे कमी प्रमाण तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकरी 9 ते 10 क्विंटल उत्पादनातच शेतकऱ्याला समाधान मानावे लागले आहे.
दरम्यान, कापूस वेचणीचे दर यंदा दुपटीने वाढले आहेत. मागील वर्षी एक किलो कापूस वेचणीला 9 ते 10 रुपये होते, तर यंदा एक किलो कापूस वेचणी झाल्यास 15 रुपये मजुरी द्यावी लागत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
कपाशीचे बियाणे, खते, फवारणी, नांगरट, रोटा, मजुरी, वेचणी, मशागत या बाबींवर कपाशी पिकाला एकरी 45 हजार रुपये खर्च आला आहे, तर लागवडीनंतर चार महिन्यांत वेचणीला येणाऱ्या कपाशी पिकातून एकरी 70 हजार रुपये हे खर्चाच्या व कष्टाच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
मागील वर्षी एक क्विंटल कापसाला 5 ते 6 हजार रुपये बाजारभाव होता. यंदा कापसाचा बाजारभाव 8 ते 9 हजार रुपये क्विंटलपर्यंत गेला आहे. मात्र, कमी पर्जन्यमान आणि मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट झाली आहे. – रावसाहेब आरंगळे, शेतकरी मानोरी
Comments are closed.