खरातच्या बायकोचा जामीन फेटाळला; अटक अटळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भोंदूगिरी आणि ब्लॅकमेलिंग करून अशोक खरात याने कोटय़वधी रुपयांची माया जमविली आहे. बँक खात्यातून सात कोटी रुपयांचे व्यवहार होऊनही माझा व्यवहाराशी संबंध नाही, अशी भूमिका त्याची फरार पत्नी कल्पना हिने घेतली आहे. पापात तीसुद्धा भागीदार होत नसल्याने खरात एकाकी पडला आहे. दरम्यान, राहाता न्यायालयाने बुधवारी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून अटक अटळ आहे.

पोलीस आणि एसआयटीला गुंगारा देऊन खरातची पत्नी कल्पना ही 31 मार्चपासून फरार आहे. जमीन खरेदीत फसवणूक केल्याचा गुन्हा तिच्यासह खरातवर दाखल आहे. अटकपूर्व जामिनावर बुधवारी अहिल्यानगर जिह्यातील राहाता न्यायालयात सुनावणी झाली. खरात व त्याच्या पत्नीचे बँक व्यवहार हे काही मालमत्ता खरेदीत झालेले आहेत. त्याची पत्नी कल्पना हिच्या बँक खात्यातून सात कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. जमिनीच्या मुखत्यारपत्रावर तिचा अंगठा व सही आहे, चेकवर तिच्या सह्या आहेत, दोघांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे, याचाच अर्थ पतीने केलेले व्यवहार तिला मान्य आहेत. चाळीस टक्के मालमत्तेत ती भागीदार असल्याने तिला अटकपूर्व जामीन मिळू नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राहाता येथील न्यायालयाने काही तास निर्णय स्थगित ठेवला होता. तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरून सायंकाळी कल्पना हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तिचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

बायकोने जबाबदारी झटकली

कल्पना खरात हिचा सात कोटींच्या व्यवहारात कुठलाही संबंध नाही, ती फक्त नावापुरती होती, सर्व व्यवहार अशोक खरात हाच करायचा. फक्त खात्यातून व्यवहार झाल्याने पत्नी आरोपी होऊ शकत नाही, असा युक्तिवाद कल्पनाच्या वकिलांनी केला. एकूणच काय तर खरातच्या पापाच्या मालमत्तेत त्याची पत्नीही भागीदार व्हायला तयार नसल्याने तो एकाकी पडला आहे.

Comments are closed.