पेपरफुटीस जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा! युवासेनेचे मुंबई विद्यापीठ प्र-कुलगुरूंना निवेदन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पेपरफुटीबाबत संताप व्यक्त करत आज युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कार्यालयावर धडक देत प्र कुलगुरूंची भेट घेतली. या परीक्षा काळात तीन प्रश्नपत्रिका फुटल्याचे निदर्शनास आले असून दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला. या पेपरफुटीस जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी सिनेट सदस्यांनी निवेदनाद्वारे प्र-कुलगुरूंकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठाची तृतीय वर्ष वाणिज्य शाखा सत्र-6 परीक्षेला 9 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे, मात्र या काळात तब्बल तीन प्रश्नपत्रिका फुटल्या. ही बाब गंभीर असूनही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हा परिश्रम घेऊन अभ्यास केलेल्या होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे ही परीक्षा तत्काळ रद्द करून पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी सिनेट सदस्यांनी प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, मयूर पांचाळ आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आदी उपस्थित होते.

Comments are closed.