नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर ‘रशियन’ मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन्
गुन्हे बातम्या: सोशल मीडियाच्या (Social Media) चकचकीत जगात कधी कोणावर विश्वास बसेल याचा काही नेम नसतो. एका सामान्य फ्रेंड रिक्वेस्टने सुरू झालेला संवाद थेट दिल्ली विमानतळावरील एका गंभीर संकटापर्यंत पोहोचेल आणि त्यातून लाखो रुपयांच्या फसवणुकीचा अत्यंत भयानक खेळ रचला जाईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. रशियन महिलेच्या नावाखाली एका 56 वर्षीय व्यक्तीला तब्बल 7 लाख 38 हजार 500 रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
Crime News: गोड बोलून जिंकला विश्वास
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील 56 वर्षीय तक्रारदार हे 11 फेब्रुवारी रोजी त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त असताना, त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका अज्ञात महिलेने संपर्क साधला. सुरुवातीला अत्यंत गोड बोलून तिने त्यांचा विश्वास पूर्णपणे जिंकून घेतला. संवाद वाढल्यानंतर तिने आपण रशियाहून (Russia) भारतात आल्याचे सांगितले. सध्या आपण दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो असल्याचे भासवून तिने पुढील जाळे टाकण्यास सुरुवात केली.
Crime News: कस्टम अधिकाऱ्यांचे नाव सांगून मागितले पैसे
महिलेने तक्रारदाराला सांगितले की, तिच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाच्या कागदपत्रांमुळे दिल्ली विमानतळावरील कस्टम विभागाच्या (Customs Department) अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले आहे. या कस्टमच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तिला तातडीने काही पैशांची गरज आहे. जर त्यांनी तिला या संकटात पैशांची मदत केली, तर ती कस्टम कार्यालयातून बाहेर पडताच संपूर्ण पैसे प्रामाणिकपणे परत करेल, असे आमिषही तिने दिले.
Crime News: 7.38 लाख उकळले
महिलेच्या या भावनिक जाळ्यात तक्रारदार पूर्णपणे अडकले. त्यांनी तिच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवत, तिने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर (Bank Accounts) टप्प्याटप्प्याने तब्बल 7 लाख 38 हजार 500 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर (Online Transfer) केले. पैसे बँक खात्यात जमा होताच, समोरच्या महिलेने अचानक आपले सर्व फोन आणि सोशल मीडिया अकाउंट बंद करून संपर्क तोडून टाकला. आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुद्रिक यांनी तातडीने वालीव पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून, सायबर पोलिसांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.