फुटबॉल प्रेमापुढे अभ्यासही थांबला! अर्जेंटिना-स्पेन फिफा फायनलमुळे केरळ सरकारचा मोठा निर्णय

केरळ हा फुटबॉलवेडा राज्य आहे. तेथे या खेळाची मुळे खोलवर रुजलेली असून, मोठ्या प्रमाणावर सामुदायिक स्पर्धा आणि अनेक दशकांपासून सुरू असलेल्या उत्साही स्थानिक लीग्स आयोजित केल्या जातात. सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषकामुळे तेथिल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात रंगणार आहे. हा सामना विद्यार्थांना पाहता यावा, यासाठी केरळच्या शिक्षण विभागाने रविवारी (19 जुलै) मोठा निर्णय जाहीर केला. त्यांनी सोमवारी (20 जुलै) सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

फुटबॉलप्रेमी विद्यार्थांना रविवारी हा महत्त्वाचा सामना पाहण्यासाठी रात्री जागरण करता यावे म्हणून सुट्टीची मागणी केली गेली. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला, असे वृत्तसंस्था पीटीआयने स्पष्ट केले आहे.

सुट्टीच्या मागणीला सर्व राजकिय पक्षांकडून पाठिंबा मिळाला होता. सीपीआय (एम) नेते आणि माजी शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी राज्य सरकारला सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन केले होते. रात्री उशिरा खेळल्या जाणाऱ्या या सामन्यामुळे विद्यार्थ्यांना सोमवारी शाळेत उपस्थित राहणे कठीण होईल, असे त्यांचे म्हणणे होते.

सुट्टी जाहीर झाली असली तरी पूर्वनियोजित परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सुरू राहणार आहेत. शिक्षण मंत्री एन समसुद्दीन यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आता खुश आहात का मुलांनो, असा संदेश देत सोशल मीडियावर या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू होणारा फिफा विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी विद्यार्थांनी सुट्टीची मागणी केल्यानंतर ही सुट्टी जाहीर करण्यात आली.

फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना रविवारी (19 जुलै) न्यूयॉर्कच्या न्यू जर्सी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सोमवारी (20 जुलै) मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होईल.

या स्पर्धेत अर्जेंटिना अपराजित राहून सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
(केरळ सरकारने 20 जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे कारण फिफा विश्वचषक अंतिम 2026 स्पेन विरुद्ध अर्जेंटिना)

Comments are closed.