मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये चाकू हल्ला; महिलेच्या हाता-पायावर वार; नेमकं काय घडल
गुन्हेगारीच्या बातम्या: मुंबईहून (Mumbai) सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये (Avantika Express) एका प्रवासी महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला मुंबईहून इंदोरला आपल्या मुलांना आणण्यासाठी प्रवास करत होती. मात्र, प्रवासादरम्यान तिचा तिच्याच डब्यातील काही प्रवाशांशी वाद झाला आणि त्याचे पर्यवसान थेट हिंसक हल्ल्यात झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवास करत होती. तिच्या डब्यात असलेल्या लोकांसोबत महिलेचा वाद झाला. या वादातून तिला मारहाण करून तिच्या हाता पायावर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पालघर लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल
ही घटना घडल्यानंतर पालघर स्थानकात पोलिसांनी तत्काळ लक्ष घालून संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू करताच आरोपी हे वापी येथे असल्याची माहिती मिळाली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
अटक केलेल्या आरोपींविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळ, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली असून, हल्ल्यामागील नेमकी कारणे आणि अन्य कुठले सहकारी आरोपी आहेत का, याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे रेल्वेतील प्रवासी सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन काय उपाययोजना करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिक्षाचालकावर पोलीस ठाण्यातच हल्ला
दरम्यान, तक्रार करण्यासाठी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गेलेल्या एका रिक्षाचालकावर चार जणांनी थेट पोलीस ठाण्यातच हल्ला करून मारहाण केली. या गोंधळात पोलिसांनी हस्तक्षेप करताच आरोपींनी पोलिसांवरही हात उचलला, ज्यामध्ये तिघे पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. रिक्षाचालक रिझवान शेख, जो सांताक्रूझच्या गझरबांध परिसरात राहतो, त्याचा शनिवारी दुपारी रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून काही स्थानिकांसोबत वाद झाला होता. त्यानंतर रिझवान सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचला. त्याच्या पोलीस ठाण्यात येण्याची माहिती मिळताच आशिष शर्मा नावाचा युवक आपल्या साथीदार नरेश पाटील, दिव्येश ठाकूर आणि आणखी एका इसमासह तेथे पोहोचला. त्यांनी थेट पोलीस ठाण्यातच रिझवानवर हल्ला चढवला. पोलिसांनी प्रसंगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता, चौघांनी पोलिसांवरही हात टाकत धक्काबुक्की केली. या हल्ल्यात सहायक निरीक्षक भूषण मोरे, उपनिरीक्षक साईनाथ पंतमवाड आणि हवालदार पर्वीण सुरवसे हे किरकोळ जखमी झाले.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.