शिवसेनेच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकीय वातावरण तापल
बदलापूर क्राईम न्यूज: राज्यात महायुतीचे सरकार असतानाही स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. बदलापूरच्या कात्रप परिसरात एका हळदी समारंभादरम्यान राजकीय वैमनस्यातून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलावर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सनी पाटील या तरुणाचे नाक फ्रॅक्चर झाले असून, या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रोहन पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी या दोन्ही गटांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे बदलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप पदाधिकारी मारुती पाटील यांचे चिरंजीव सनी पाटील हे कात्रप येथील एका हळदी समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून बाहेर पडत असताना, शिवसेनेचे नगरसेवक रोहन पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना गाठले. यावेळी झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपींनी बंदुकीच्या पाठीमागच्या बाजूने सनी पाटील यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरात प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सनी पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागे जुन्या निवडणुकीचे कारण असल्याचे सनी पाटील यांचे भाऊ दिनेश पाटील यांनी सांगितले. माझे वडील मारुती पाटील यांनी रोहन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्याच निवडणुकीचा राग मनात धरून हा पूर्वनियोजित कट रचून हल्ला करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांवरती दबाव असल्याचा भाजापकडून आरोप
दरम्यान, या घटनेनंतर बदलापूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. तर पोलिसांवरती दबाव असल्याचा आरोप करत आता भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले असून भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी दबावाखाली न येता निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत शिवसैनिकांना कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही तसेच मारहाणीचा आरोप लाभलेल्या नगरसेवक देखील नॉट रिचेबल आहे. तर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि राजकीय असल्याने पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास सध्या नकार दिला आहे.
नगरसेवकावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
या हल्ल्यानंतर बदलापूर भाजप आक्रमक झाली असून, आरोपी नगरसेवकावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या घटनेमुळे बदलापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात शिवसेना-भाजपमधील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.