बीडमध्ये ट्रकचालक तरुणाला मुलीच्या कुटुंबीयांनी संपवलं, शेतातलं नको ते दृश्य पाहून वडील संतापले
बीड: बीड जिल्ह्यात विकास बनसोडे या ट्रकचालक तरुणाची हत्या झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या तरुणाला त्याच्या पूर्वीच्या मालकाने दोन दिवस पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण केली होती. यामध्ये विकासचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात केली होती. त्यावेळी या हत्येमागील (Beed Murder) खरे कारण समोर आले आहे. विकास अण्णा बनसोडे (वय 23) याचे ट्रकचा मालक असणाऱ्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासला कामावरुन काढूनही टाकले होते.
विकास बनसोडे हा आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील रहिवासी होता. गेल्या आठवड्यात विकास कड परिसरात आला होता. त्याचे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. हे दोघेजण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यानंतर मुलीचे वडील संतापले होते. त्यांनी नातेवाईकांसह विकास बनसोडे याला दोन दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले. याठिकाणी दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकास बनसोडे याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे विकासचे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते. या अमानुष मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच विकास बनसोडे याची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली होती.
बीड पोलिसांनी याप्रकरणात एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींमध्ये समावेश असलेले बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे हे अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून या सगळ्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत.
हत्येनंतर आरोपींचा विकासच्या कुटुंबीयांना फोन
विकासला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून मारहाण करत असताना आरोपींनी विकासच्या फोनवरुनच त्याच्या आई-वडिलांना फोन केला होता. त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागरने विकासच्या आईवडिलांना तातडीने आमच्या घरी निघून या, असे सांगितले. त्यांच्या फोनवरील संभाषणाची क्लीप समोर आल्याचे समजते. त्यावेळी विकासच्या आई-वडिलांनी आमच्या मुलाला आणखी मारु नका, अशी विनवणी केली. मात्र, तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता.
https://www.youtube.com/watch?v=ut_bgizsa_u
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.