नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तर

गुन्हे बातम्या: राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात आणि कल्याण जवळील मारळ गाव परिसरातील धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. कल्याणमध्ये एका 36 वर्षीय सुपरवायझरला अज्ञात हल्लेखोराने पोटात वार करून संपवले, तर नाशिकमध्ये कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सालीचा मेव्हण्याने जीव घेतल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे संबंधित परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका नराधम मेव्हण्याने आपल्याच सालीला चाकूने भोसकून संपवले. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिला (साली) चे नाव आहे, तर श्याम माळी असे मारेकरी मेव्हण्याचे नाव आहे.

Nashik Crime News: सालीचा मेव्हण्याने घेतला जीव

आरोपी श्याम माळी आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. हाच कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आणि श्यामची समजूत काढण्यासाठी मयत छाया जाधव या तिचे पती, आई आणि भाऊ यांच्यासह भऊर फाटा येथे आल्या होत्या. सर्वांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, आरोपी श्यामचा राग अनावर झाला आणि त्याने अचानक छाया यांच्या छातीवर चाकूने जोरदार वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छाया यांना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे भांडण सोडवताना छाया यांचा भाऊ सोनू कराटे याच्या दोन्ही हातांवरही चाकूचे वार लागल्याने तो जखमी झाला आहे.

Nashik Crime News: सरपंच आणि ग्रामस्थांची तत्परता; आरोपीला पकडले!

घटनेनंतर आरोपी श्याम माळी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, खामखेडा गावाचे लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत धाडसाने फरार आरोपी श्याम माळी याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी देवळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Kalyan Crime News: कल्याण मारळ गाव परिसरातील धक्कादायक घटना

दरम्यान, कल्याणजवळील मारळ गाव परिसरातील मलखन कंपाऊंड येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका 36 वर्षीय तरुणाची अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. रवींद्र आहिरे असे मृत तरुणाचे नाव असून, तो एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी 7 च्या सुमारास रवींद्र यांच्या आईला अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तातडीने आईला दवाखान्यात नेले. उपचार झाल्यानंतर आईला सुखरूप घरी आणून सोडले. त्यानंतर रात्री 9 च्या सुमारास काही वैयक्तिक कामासाठी रवींद्र पुन्हा घराबाहेर पडले.

ते मलखन कंपाऊंड परिसरात पोहोचताच, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपीने धारदार शस्त्राने रवींद्र यांच्या पोटात सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. टिटवाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात पाठवला आहे. पूर्ववैमनस्य, आर्थिक व्यवहार की वैयक्तिक वाद या सर्व बाजूने पोलीस तपास करत आहेत.

या खळबळजनक घटनेनंतर मारळ गाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. टिटवाळा पोलीस आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना करत सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ व्हायरल, समर्थकांना धोक्याचा इशारा, म्हणाले, ‘सरकार आपल्या चुकीचीच वाट बघतंय’

आणखी वाचा

Comments are closed.