शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक, 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका
नागपूर : शिक्षक भरती घोटाळ्यात एक मोठी कारवाई करण्यात आली असून आणखी एका शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना एसआयटीने अटक केली आहे. शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीच्या गैरवापराच्या संदर्भात एसआयटीच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. त्यांच्यावर तब्बल 12 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. तक्रारीच्या आधारे, सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे.
तपासात असे दिसून आले की शालार्थ ऑनलाइन प्रणालीचा बेकायदेशीरपणे वापर करून बनावट शालार्थ आयडी आणि ड्राफ्ट तयार करण्यात आले होते. बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने या बनावट आयडीद्वारे वेतन आणि देणी काढण्यात आली, ज्यामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
नागपूर शिक्षक भरती घोटाळा : आतापर्यंत 26 जणांना अटक
या घोटाळ्यात आतापर्यंत एकूण 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, लिपिक, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा संचालक आणि शिक्षक यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक १0 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
ताज्या कारवाईत, आरोपी रवींद्र शंकरराव काटोलकर यांना मंगळवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना 25 डिसेंबरपर्यंत पोलइस कोठडी सुनावण्यात आली. 2021 ते 2022 दरम्यान नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर असताना, बनावट विद्यार्थी ओळखपत्रांची माहिती असतानाही त्यांनी कोणत्याही चौकशीशिवाय पगार प्रस्ताव मंजूर केले आणि वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी सरकारचे नुकसान केलं.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.