हत्याप्रकरणातील फरार भाजप नेत्याचा देवदर्शनाचा सपाटा; गुवाहाटी, तिरुपती बालाजी अन्…; पोलिसांन
Nashik Crime Uddhav Nimse : नांदूर नाका परिसरात घडलेल्या राहुल धोत्रे (Rahul Dhotre Case) हत्याकांड प्रकरणात तब्बल 20 दिवस फरार असलेला भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे (Uddhav Nimse) अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. विशेष म्हणजे, फरार असताना निमसेने राजस्थान, गुवाहाटी, तिरुपती बालाजी अशा देशभरातील प्रमुख देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. मात्र न्यायालयीन दणक्यांनंतर निमसेने स्वतःहून पोलिसांसमोर हजेरी लावली आणि लगेचच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
22 ऑगस्ट रोजी नाशिकच्या नांदूर नाका परिसरात दुचाकीचे चाक पायावर गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून भाजप माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे यांच्यात वाद झाला. हा वाद हाणामारीपर्यंत गेला आणि त्यानंतर जमाव गोळा झाला. जमावाने राहुल धोत्रे आणि त्याचा मित्र अजय कुसाळकर यांच्यावर लाकडी-लोखंडी दांडके आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या राहुलचा 29 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर उद्धव निमसेसह 10 ते 15 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काही आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र मुख्य आरोपी उद्धव निमसे घटनेनंतर फरार झाला होता.
पोलिसांना गुंगारा देत कुठे-कुठे फिरला?
फरार असताना उद्धव निमसे गुप्त ठिकाणी लपून फिरत होता. पोलिसांच्या चार पथकांकडून देशभर शोध घेतला जात असताना तो चकवा देत गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, गुवाहाटी आणि तिरुपती बालाजी येथे फिरत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, कोणत्याही हॉटेलमध्ये न थांबता, ट्रॅव्हल बसद्वारे प्रवास करत, देवदर्शनाच्या निमित्ताने तो पोलीस तपासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता. गुजरातमधील एका एअरपोर्टवर त्याचा ड्रायव्हर शेवटचा संपर्कात आल्याची माहितीही समोर आली आहे.
न्यायालयीन झटका आणि शरणागती
उद्धव निमसेने जिल्हा न्यायालयात आणि उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र दोन्ही ठिकाणी अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयीन निर्णयानंतर पोलिसी दबाव वाढल्याने अखेर 15 सप्टेंबर रोजी तो अचानक पोलिसांसमोर हजर झाला. पोलिसांनी लगेच त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या सुनावणीत सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष कोणती बाजू मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस तपासावर होते प्रश्नचिन्ह
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना 20 दिवस उद्धव निमसेचा थांगपत्ता न लागल्यामुळे पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आरोपी मोकाट फिरत असताना पोलिसांची विश्वासार्हता धक्क्यात आली होती. मात्र आता निमसेच्या आत्मसमर्पणामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.