बीडनंतर आता नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी! दाम्पत्याला धमकी देत मागितली 50 लाखांची खंड

नाशिक गुन्हा: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) बीडचे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर बीडमधील अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. आता नाशिकमधून (Nashik Crime News) देखील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंचवटीतील मखमलाबाद नाक्यावरील उदय कॉलनीत  राहणाऱ्या भाजपा कामगार आघाडीचा सरचिटणीस रोहित कैलास कुंडलवाल (Rohit Kailas Kundalwal) याने वडिलांच्या मदतीने बेकायदेशिर सावकारी केल्याचे उघड झाले आहे.

जुने नाशिक येथील व्यावसायिक दाम्पत्याकडून खासगी सावकारीतून अतिरिक्त व्याज वसूल करुन पन्नास लाखांची खंडणी मागून त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन दोघांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रोहित कैलास कुंडलवाल (34, रा. फ्लॅट-4, राधाकृष्ण बंगला, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. रोहितसह त्याच्या वडिलांविरुध्द भद्रकाली पोलिसांत खंडणीसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंद करुन रोहितला अटक करण्यात आली आहे.

पन्नास लाखांची मागितली खंडणी

याबाबत एका 40 वर्षीय कापड व्यावसायिक महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रोहित व त्याचे वडील कैलास बाबुलाल कुंडलवाल (56) यांच्याविरुद्ध कार्यवाही सुरु झाली आहे. पीडित महिलेचे भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील हुंडीवाला लेन येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. तिने व पतीने कपडे व्यवसाय थाटण्यासाठी कुंडलवाल यांच्याकडून व्याजाने पंधरा लाख रुपये घेतले. यानंतर, 2022 ते 12 मार्च 2025 या कालावधीत कुंडलवाल यांनी महिलेस दिलेल्या 15 लाख रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात अवाजवी दराने तब्बल 38 लाख रुपये वसूल केले. त्यानंतर मुद्दल व व्याज धरुन पन्नास लाख रुपयांची मागणी केली.

पिस्तूलाचा धाक दाखवत पैशांची मागणी

ही रक्कम न दिल्याने संशयिताने पीडितेस कॉलेज रोडवरील बिग तवा हॉटेल येथे बोलावून फोर्ड इंन्डेव्हर कारमध्ये जबरदस्तीने बसवून प्रसाद सर्कल जवळील जीममध्ये नेले. तेथे तिला लज्जा उत्पन्न होईल अशा शिव्या देऊन हातवारे केले. यानंतर, पीडितेसह तिच्या पतीस याने पंचवटीतील भक्तीधाम सिग्नलजवळ भेटण्यास बोलावून पिस्तूलाचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. यानंतर दुकानात येऊन रोहितने अवाजवी पैशांची मागणी करून पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून जवळ ओढत अश्लिल कृत्य केले. त्यामुळे ‘पुढचे काय ते आता समजून घ्या’ अशी धमकी दिली. यानंतर रोहितसह त्याच्या वडिलांविरुध्द भद्रकाली पोलिसांत खंडणीसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंद करुन रोहितला अटक करण्यात आली आहे.

संशयित भाजपचा पदाधिकारी

दरम्यान, संशयित रोहित कुंडलवाल हा गेल्या आठ वर्षांपासून आरके फाऊंडेशन नावाने काम करतो. त्याचे मधुबन कॉलनीलगत संपर्क कार्यालय असून त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटसवर त्याने भाजपा कामगार आघाडी सरचिटणीस आणि भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी अशा नावाने पोस्ट, बॅनर अपलोड केले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

Nashik Crime: मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करून 25 वर्षीय तरूणानं उचललं टोकाचं पाऊल; नाशिकमधील 12 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..

Comments are closed.