जनगणनेच्या कामास नकार; ठाण्यातील 12 शिक्षकांवर गुन्हे, पालिका प्रशासनाच्या कारवाईने खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जनगणनेच्या कामासाठी नकार देणाऱ्या ठाण्यातील १२ हून अधिक शिक्षकांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनगणनेच्या कामासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला गैरहजर राहत शिक्षकांनी या प्रशिक्षणालाच विरोध केला होता. याची गंभीर दखल घेत ठाणे महापालिका प्रशासनाने कारवाईची माहीम हाती घेत या सर्व शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक शाळांमधील शिक्षकांवर दिव्यातील जनगणनेच्या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये ड्राय ड्रॉप इंग्लिश स्कूल, ग्लोबल इंग्लिश स्कूल आणि साऊथ इंडियन स्कूल या शाळांतील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान या तीन शाळांमधील शिक्षकांनी जनगणना २०२७ च्या कामासाठी आयोजित प्रशिक्षणाला दांड्या मारल्या. याप्रकरणी १२ हून अधिक शिक्षकांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जनगणना प्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिक्षकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत संबंधित शिक्षकांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रगणक, पर्यवेक्षक एक हजार कमर्चारी जुंपले

ठाणे महापालिकेने २३ एप्रिलपासून जनगणनेसाठी प्रशिक्षण शिबिरे सुरू केली होती. यामध्ये दिव्यात एकूण २८ बॅच तयार करण्यात आल्या आहेत. एका बॅचमध्ये एकूण ५० जणांचा समावेश असून आतापर्यंत २८ बॅचमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात ११ बॅचला ट्रेनिंग देण्यात येणार आहे. दिवा प्रभाग समिती हद्दीतील जनगणनेसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून १ हजार ७५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती एका वरिष्ठ जनगणना अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रशासनाचा इशारा

या कारवाईमुळे शिक्षक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. जनगणना कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांविरोधात पुढील काळात आणखी कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

शिदिव्यामधील तीन शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. मात्र संबंधित शिक्षकांनी या शिबिरांना अनुपस्थित राहून कामास नकार दिला. त्यामुळे मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

शिवप्रसाद नागरगोजे (सहाय्यक आयुक्त, जनगणना अधिकारी)

Comments are closed.