ड्युटीवर जातो म्हणून निघाले, फोन बंद, शोधाशोध अन्…; रस्ता क्रॉस करताना गाडीने उडवलं; पोलिसांच
पुणे: पुण्याच्या तळेगावमध्ये सीआरपीएफच्या (CRPF) जवानाचा अपघाती मृत्यू झाला. पण नेमकं कोणी ठोकरलं? याचा शोध घेण्यात तळेगाव पोलिसांकडून हलगर्जीपणा सुरु असल्याचं बोललं जातं आहे. सीआरपीएफमध्ये गांधीनगर, गुजरात येथे काम करत असलेला तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला जवान प्रशांत कदम हा २५ मार्च रोजी घरातून ड्युटीवर जातो असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर लोणावळा येथून पुन्हा तो तळेगावच्या दिशेने कोणाला काही न सांगता आला. फोन देखील बंद ठेवला. २५ मार्च रोजी रात्री सोमाटणे फाटा जवळ हॉटेल अंगण समोर रस्ता क्रॉस करताना त्याला अनोळखी गाडीने उडवले आणि तो गंभीर जखमी झाला. (CRPF)
गंभीर जखमी अवस्थेत त्याला वायसीएम रुग्णालयात रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांचा शोध घेणे पोलिसांनी अपेक्षित होते. प्रशांत कदम हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात केली होती. मागील दोन ते तीन दिवस त्याचा कुटुंबीय आणि पोलिसांकडून शोध सुरू होतं मात्र, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातच संबंधित व्यक्ती हा बेपत्ता झाल्याची आणि अनोळखी मृतदेह मिळाल्याची नोंद असून देखील त्याचा तात्काळ तपास करण्यात आला नाही. आज संबंधित प्रशांत कदम यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याचा मेसेज मित्रांनी ( पोलिसांनी नाही) शोध घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना मिळाला आणि दुःखाचा डोंगर संबंधित कुटुंबावर कोसळला. एखाद्या गंभीर घटनेमध्ये पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन तपास करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. (CRPF)
प्रशांत प्रकाश कदम (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. प्रशांत यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील असा परिवार आहे. सीआरपीएफ जवान असलेले प्रशांत कदम गुजरातमधील गांधीनगर येथे कार्यरत होते. ते तळेगाव दाभाडे येथून २५ मार्चला गांधीनगर येथे जाण्यासाठी निघाले. लोकल रेल्वेने ते लोणावळा येथे गेले. तेथून ते लोकल रेल्वेने परत तळेगावकडे आले. मात्र, याबाबत कुटुंबीयांना माहिती नव्हती. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, गांधीनगर येथील त्यांच्या कार्यालयाकडून कुटुंबीयांकडे विचारणा झाली. प्रशांत पोहोचले नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी २७ मार्चला ते बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली. सोशल मीडियावरही पोस्ट व्हायरल केली.
रुग्णवाहिका चालकाने ओळखला मृतदेह
प्रशांत कदम बेपत्ता असल्याबाबत सोशल मीडियावरून माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने फोटोवरून त्यांची ओळख पटवली. सोमाटणे फाटा परिसरातून आपल्या रुग्णवाहिकेतनू रुग्णालयात नेलेला मृतदेह प्रशांत यांचाच होता, असे या चालकाने सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी ओळख पटवून सोमवारी (दि. ३० मार्च) मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांकडून तपासात गंभीर हलगर्जीपणा झाला आहे. अनोळखी मृतदेह आणि बेपत्ता झाल्याबाबत एकाच पोलिस ठाण्यात नोंद असूनही पोलिसांनी तपास केला नाही. त्यामुळे प्रशांत यांच्याबाबत पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळाली नाही. दोन-तीन दिवस शोध सुरू असल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात तपासात हलगर्जीपणा झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
नातेवाईक व मित्रांनी शोध घेतल्यामुळे मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली. प्रशांत यांचा मृत्यू झाल्याबाबत समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
आणखी वाचा
Comments are closed.