सीएसएमटीतील प्लॅटफॉर्मच्या कामासाठी 5 सप्टेंबरपर्यंत ब्लॉक, तेजस एक्सप्रेस व इतर गाडय़ांच्या प्रवाशांचे प्रचंड हाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील प्लॅटफॉर्म क्र. 16 वरील काम सात महिन्यांनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही. या एका प्लॅटफॉर्मसाठी तब्बल पाचव्यांदा ब्लॉकची मुदत वाढवण्यात आली आहे. आता 5 सप्टेंबरपर्यंत ब्लॉक घेतला जाणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे तेजस एक्सप्रेस व इतर गाडय़ांच्या प्रवाशांचे आणखी 15 दिवस प्रचंड हाल होणार आहेत.

सीएसएमटीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. यासाठी रेल्वेने पहिल्यांदा 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलदरम्यान ब्लॉक घेतला होता. आधी 19 मे, नंतर 13 जून, 5 ऑगस्ट, 21 ऑगस्ट आणि आता 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. गणेशोत्सवापूर्वी हा कामाचा खेळखंडोबा थांबणार की नाही, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

ब्लॉक अवधित हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस, अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस या गाडय़ांचा प्रवास सीएसएमटीऐवजी दादर येथे समाप्त होणार आहे, तर मंगळुरू-सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंतच चालवण्यात येणार आहे.

Comments are closed.