ऋषीपंचमीनिमित्त दगडूशेठ गणपती समोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; शंखनाद, ओंकार जप अन् गणेशगीतांची पुणेकरांना भुरळ

‘ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया…’ आणि ‘ओम गं गणपतये नमः’ च्या जयघोषात ऋषिपंचमीच्या मंगल प्रसंगी लाडक्या गणरायासमोर हजारो महिलांनी आपल्या भक्तीचा आणि स्त्री शक्तीचा जागर केला. निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने 134 व्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी तब्बल 35 हजारांहून अधिक महिलांनी एकाच सुरात अथर्वशीर्ष पठण करत दगडूशेठ गणपतीला नमन केले.

उत्सव मंडपासमोर उभारण्यात आलेल्या भव्य ‘प्रेम मंदिराच्या’ प्रतिकृतीसमोर हा अभूतपूर्व सोहळा पार पडला. पावसाचे सावट असतानाही, हातात दिवे आणि पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या महिला मध्यरात्री 2 वाजेपासूनच दगडूशेठ मंदिराच्या परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली होती. भल्या पहाटे सुरू झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि मध्यवर्ती पुणे शहर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.

शंखनाद, ओंकार जप अन् गणेशगीतांची भुरळ

सोहळ्याच्या सुरुवातीला महिलांच्या दणदणीत शंखनादाने वातावरणात एक नवी ऊर्जा निर्माण केली. यानंतर मन एकाग्र करणारा सामूहिक ओंकार जप करण्यात आला. ‘गणराजा गणनायका… मोरया रे बाप्पा मोरया रे…’ या गणेशगीताच्या सुमधुर सादरीकरणाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर मुख्य अथर्वशीर्ष पठण आणि महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमाचे यंदा 41 वे वर्ष होते.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या सोहळ्याप्रसंगी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके आणि सचिन आखाडे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.