Rahul Gandhi “दलितांना काँग्रेसमध्ये मध्यवर्ती भूमीका असेल” राहुल गांधींनी केले बसपा संस्थापक कांशीराम यांचे कौतुक

सोमवारी काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाच्या बैठकीत राहुल गांधी यांनी दलित समाजाने पक्षाला दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, ८० आणि ९० च्या दशकात काँग्रेसने दलितांसाठी उपाययोजना केल्या असत्या तर आज प्रादेशिक पक्ष उदयालाच आले नसते आणि दलित समाज तिकडे आकर्षितच झाला नसता.

दलितांची काँग्रेसमधील भूमीका

राहुल गांधी यांनी दलित समाजाबद्दल अपेक्षा व्यक्त करताना असे म्हटले आहे की, आता हा समाज काँग्रेस पक्षात मध्यवर्ती भूमीका बजावेल. ANI च्या वृत्तानुसार राहुल गांधींनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचं कौतुक केलं आणि त्यांनी दलित समाजात आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले असे म्हटले आहे.

बाबासाहेबांचं स्वप्न आणि काँग्रेस

यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, आज भाजप सगळे प्रादेशिक पक्ष मोडून काढत आणि दलितांवरील अत्याचारात वाढ होत आहे. त्याच संदर्भात काँग्रेस दलितांना पक्षात मध्यवर्ती स्थान देईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करेल असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काही काळापूर्वी राहुल गांधींनी ओबीसी समाजाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाल्याचे कबूल करत माफीही मागितली होती. राहुल गांधींची एकूण मांडणी पाहता ते दलित आणि मागास समाजांना काँग्रेसविषयी आस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक

आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूका असताना राहुल गांधी चांगलेच सक्रिय झालेले दिसतात. त्यांचा मतदारसंघ रायबरेलीमध्ये काही दिवसांपूर्वी ते वीरा पासी यां दलित स्वातंत्र्यसैनिकाच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला गेले होते.

Comments are closed.