झुरळांबाबत अतिसंवेदनशील होऊ नका.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे महत्वपूर्ण मतप्रदर्शन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या संदर्भात कोणीही अतिसंवेदनशील असण्याची अवश्यकता नसून योग्य वेळी यासंबंधी न्यायालय विचार करेल, असे महत्वपूर्ण मतप्रदर्शन भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले आहे. या ऑन लाईन गटासंबंधी दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी या अर्थाचे मतप्रदर्शन केले आहे.
न्यायाधीश न्यायालयात सुनावणीप्रसंगी जी टिप्पणी करतात, तिचा उपयोग व्यापारी किंवा राजकीय लाभासाठी केला जाऊ नये, यासाठी न्यायालयाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करणारी एक याचिका सादर झाली आहे. तर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्यात यावा, अशी मागणी करणारी आणखी एक याचिका सादर झाली आहे. या दोन्ही याचिकांवर तातडीची सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली.
एका टिप्पणीतून प्रसंग
काही दिवसांपूर्वी बनावट पदव्या घेऊन वकीली करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भातील याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होत असताना, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एक टिप्पणी केली होती. ‘काही लोक बनावट पदव्या मिळवितात. काही लोकांनी घटनात्मक संस्थांवर शाब्दिक हल्ला करण्याचा सपाटा लावला आहे. तर काही बेकार युवकांनी ‘झुरळां’प्रमाणे घटनात्मक संस्थांवर मिडियाच्या माध्यमातून, सोशल मिडियाच्या माध्यमातून आणि माहिती अधिकाराचा दुरुपयोग करुन हल्ले चढविण्याची कृती चालविली आहे’ अशा अर्थाची टिप्पणी होती. या टिप्पणीचा उपयोग करुन ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नामक एक ऑनलाईन ‘पक्ष’ स्थापन करण्यात आला. सध्या त्याची सोशल मिडियामधून चर्चा होत आहे. नंतर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी आपली विधाने अर्थभ्रष्ट करुन प्रसिद्ध केल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. सध्या या कथित पक्षाची वेबसाईट बंद केली गेली आहे.
याचिकांचा उद्देश
या तथाकथित ‘पक्षा’च्या विरोधात सादर करण्यात आलेल्या दोन याचिकांचा उद्देश काय हा प्रश्न आता चर्चिला जात आहे. कोणत्याही प्रकरणाच्या सुनावणीत न्यायाधीश त्यांची मते तोंडी मते व्यक्त करुन प्रकरणाची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा टिप्पणींचा उपयोग राजकीय हेतू साध्य करण्यासाठी किंवा पैसा मिळविण्याची केला जाऊ नये, यासाठी कायदा करण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात एक याचिका सादर करण्यात आली आहे. काही नेत्यांच्या मते कॉक्रोच जनता पार्टीच्या ऑन लाईन फॉलोअर्सपैकी जवळपास 50 टक्के पाकिस्तानातील आहेत. तर बांगला देश, तुर्किये आणि अन्य देशांमधील फॉलोअर्सची संख्या आणखी 40 टक्के आहे. भारतातील फॉलोर्सची संख्या केवळ 9 टक्के आहे. मात्र, या गटाकडून हे आरोप नाकारण्यात आल्याचे दिसत आहे.
Comments are closed.