Dapoli News – जुन्या नाण्यांच्या खरेदीचे आमिष दाखवून दापोलीतील व्यक्तीची लाखांची ऑनलाइन फसवणूक
जुन्या नाण्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत दापोलीतील एका व्यक्तीची तब्बल १६ लाख ८० हजार २५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल जनार्दन जाधव (वय ५१, रा. जालगाव, पांगारीवाडी, प्रियदर्शनी अपार्टमेंट, दापोली) यांना आरोपींनी मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या ताब्यात असलेल्या जुन्या नाण्यांची खरेदी करून त्याबदल्यात मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर विविध शुल्क, प्रक्रिया फी तसेच इतर कारणे सांगून आरोपींनी वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून अनेक वेळा आरटीजीएसद्वारे रक्कम पाठविली. मात्र कोणतीही रक्कम परत मिळाली नाही. तसेच अधिक पैसे भरण्याचा तगादाही लावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी साहिल कुमार, विशाल सिंह तसेच स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासविणारा उमाकांत पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दापोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Comments are closed.